बबन परब: चुनवरे येथील भजन स्पर्धा पारितोषिक वितरण प्रसंगी केले प्रतिपादन..
⚡मालवण ता.०३-: भजन म्हणजे परमेश्वराची आराधना करणे, प्रापंचिक माणसांना परमेश्वरापर्यंत पोहचण्याचा सोपा मार्ग म्हणजे भजन होय. भजनातील नामस्मरणाने माणूस परिपूर्ण होतो, हे लक्षात घेऊनच आमच्या समितीने भजन स्पर्धेचे आयोजन केले होते, त्याला भजनी बुवांनी आणि भजन रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने ही स्पर्धा यशस्वी झाली, असे प्रतिपादन श्री देव जैन रामेश्वर तिठाई मंदिर देवस्थान, चुनवरे चे सेक्रेटरी श्री. बबन परब यांनी चुनवरे येथे बोलताना केले.
चुनवरे येथील श्री देव जैन रामेश्वर मंदिर जीर्णोद्धार आणि कलशारोहण सोहळ्याच्या निमित्ताने भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या पारितोषिक वितरण समारंभा प्रसंगी श्री. बबन परब हे बोलत होते. यावेळी मंडळाचे आबा परब, मकरंद परब, बाळा परब व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. प्रारंभी प्रभुदास आजगावकर यांनी उपास्थितांचे स्वागत केले.
या सोहळ्याच्या निमित्ताने भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या भजन स्पर्धेत माऊली प्रासादिक भजन कणकवली बिडयेवाडी, दत्तप्रसाद प्रासादिक भजन मंडळ वर्दे, विश्वकर्मा प्रासादिक भजन मंडळ राठीवडे, महापुरुष प्रासादिक भजन मंडळ पिंगुळी, सिद्धिविनायक प्रासादिक भजन मंडळ कणकवली हे सहभागी झाले होते. स्पर्धेत सहभागी झालेल्या पाचही स्पर्धक संघांनी दर्जेदार भजन करून रसिकांची वाहवा मिळवली.
या स्पर्धेत श्री महापुरुष प्रासादिक भजन मंडळ पिंगुळी या मंडळाने प्रथम क्रमांक पटकावीला. तर द्वितीय क्रमांक श्री सिद्धिविनायक प्रासादिक भजन मंडळ कणकवली यांनी व तृतीय क्रमांक श्री दत्त प्रासादिक भजन मंडळ वर्दे यांनी मिळविला. तसेच उत्कृष्ट कोरस – श्री महापुरुष प्रासादिक भजन मंडळ, पिंगुळी, उत्कृष्ट हार्मोनियम – दुर्गेश मीठबावकर, उत्कृष्ट पखवाज मिलिंद मेस्त्री, उत्कृष्ट गायक प्रसाद आमडोसकर यांची निवड करण्यात आली.
स्पर्धेचे परीक्षण सागर राठोड व महेश परब यांनी केले. सूत्रसंचालन प्रभुदास आजगावकर यांनी केले. यावेळी भजन रसिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
