भाजपचे नेते अशोक नेते यांचा दावा: नारायण राणेंचा विजय पक्का मोदी सरकारने देशहिताचे निर्णय घेतले विरोधकांकडे विकासात्मक अजेंडा नाही..
कणकवली: इंडिया आघाडीतील काँग्रेससह अन्य घटक पक्षांकडून भाजपच्याविरोधात अप्रचार केला जात आहे. इंडिया आघाडीला पराभव दिसू लागल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. तोडा, फोडा आणि राज्य करा आणि मतांचे राजकारण हा काँग्रेसचा अजेंडा आहे. सत्तेत असताना काँग्रेसने देशात विकासात्मक काेणतेही काम नाही आणि देश हिताचे निर्णय घेतले नाहीत. मागील 10 वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकारने सर्वसमावेशक निर्णय घेऊन देशाचा कायापालट केला. भाजप पक्ष हा विकासाचे तर विरोधक हे मतांचे राजकारण करतात, असा गंभीर आरोप भाजपच्या एसटी मोर्चा विभागाचे राष्ट्रीय महामंत्री, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ भाजपचे निरीक्षक, गडचिरोली-चिमूरचे खासदार अशोक नेते यांनी केला. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार व केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या विजय पक्का असून या मतदारसंघातील महायुतीतील घटक पक्षांमध्ये कोणतेही मतभेद नसून पक्षाचे सर्वनेते पदाधिकारी, कार्यकर्ते राणेंच्या विजयासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत, असे सांगतानाच राज्यात महायुतीच्या 40 पेक्षा जागा निवडून येतील, असा दावा त्यांनी केला.
येथील प्रहार भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत श्री. नेते बोलत होते. यावेळी भाजपच्या ओबीसी सेलचे बाबूराव कोहाळे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख संजय आग्रे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक, आरपीआयचे पदाधिकारी रमाकांत जाधव, जिल्हाध्यक्ष अजित कदम, भाजपच्या एससी-एसटीचे सेलचे जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव, राजू राऊळ, मनसेचे कुडाळ-मालवण विधानसभा प्रमुख धीरज परब, शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख महिंद्र सावंत, तालुकाप्रमुख भूषण परूळेकर, सुनील पारकर आदी उपस्थित होते.
नेते म्हणाले, केंद्रात भाजप व त्यांच्या मित्रपक्षांचे सरकार पुन्हा आल्यास राज्यघटना बदलण्यात येईल, असा अपप्रचार इंडिया आघाडीतील घटक पक्षांकडून केला जात आहे. मागील 10 वर्षांत केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने राज्यघटनेत कोणताही बदल केलेला नाही. 2014 साली देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. त्यानंतर संसदेत प्रवेश करताना संसदेच्या प्रवेशदारावर ते नतमस्तक झाले होते. त्यानंतर पीएमच्या खुर्ची पहिल्यांच बसताना त्यांनी देशाच्या विकासाचा निर्धार केला. यानुसार त्यांनी गेली 10 वर्षांत सर्व घटकांना न्याय देऊन देशाचा कायापालट केला असल्याचे त्यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीत राज्यात मविआतील घटक पक्षांकडून महायुतीवर खोटेनाटे, बिनबुडाचे, तथ्यहीन आरोप केले जात आहेत. खोटे बोला पण रेटून बोला अशापद्धतीने मविआतील नेतेमंडळी बोलत आहे. विरोधकांकडे विकासात्मक अजेंडा नसल्यामुळे त्यांच्याकडून धर्मा धर्मांत व जाती-पातीत तेढ निर्माण करून मतांचे राजकारण केले जात आहे. देशात 60 वर्षे काँग्रेसची सत्ता होती. मात्र, त्यांनी देशाच्या हिताचे कोणतेही निर्णय घेतले नाही, असा आरोप त्यांनी केला.
भाजप जर संविधान, आदिवासी, दलित, मुस्लिम विरोधी असता तर देशाच्या सर्वोच्चपदी ए. पी. जे. अब्दूल, रामनाथ कोविंद, द्रौपदी मुर्मू यांना विराजमान केले केले नसते. भाजप हा समाजातील सर्व घटकांनासोबत घेऊन जाणारा पक्ष आहे. मुंबईतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा प्रश्न काँग्रेसने खितपत ठेवला होता. मात्र, महाराष्ट्रात देवेंद्र फडवणीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी इंदू मिलच्या जागेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मारक उभारण्याचा प्रश्न मार्गी लावला. आदिवासीचे दैवत बिरसा मुडंा यांचा जन्म दिवस 15 नोव्हेंबर हा गौरव दिन साजरा करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला. कश्मीरमधील 370 कलम हटविण्याचा धाडसी निर्णय मोदी सरकारने घेतला. 500 वर्षांचा राम मंदिराचा प्रश्न मार्गी लावून अयोध्येत भव्य राममंदिर बांधले असून आता लाखो भक्त रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी येत आहेत. मागील 10 वर्षांत मोदी सरकारने अगणित चांगले निर्णय घेत देशाची प्रतिमा जगात उंचविण्याचे काम केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींना विश्वगुरु म्हटले जात आहे. ओबीसी आयोगाला घटनात्मक अधिकारी प्राप्त करून देण्याचे काम मोदी सरकारने केले.
बॉक्स
राऊतांचे ते स्वप्नच राहणार
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मविआचे उमेदवार विनायक राऊत हे आपण अडीच लाखांच्या मताधिक्यांनी निवडून येणार असे सांगत आहे. मात्र, त्यांचे हे स्वप्नच राहणार आहे, असा टोला त्यांनी लागवला. या मतदारसंघातीतून महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचा 101 टक्के विजय पक्का असल्याचा दावाही त्यांनी केला.
