प्रभाकर सावंत ; ४ रोजी राज ठाकरेंची तोफ धडाडणार..
कुडाळ, प्रतिनिधी
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे ४ एप्रिल रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून कणकवली येथे होणाऱ्या जाहीर सभेला त्यांच्या धडाकेबाज तोफा धडाडणार आहेत. या सभेच्या आदल्या दिवशी होणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या सभेत महायुतीच्या नेत्यांच्या विरोधात बेताल वक्तव्य केल्यास या सभेत अंगावर आल्यास शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही असा इशारा भाजप जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिला.
भाजप जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी मंगळवारी येथील हॉटेल लाईमलाईट येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजपा केंद्रीय कार्यकारणी सदस्य बंड्या सावंत, मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब, मनसे तालुका अध्यक्ष हेमंत जाधव, प्रदिप माने आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत म्हणाले की, गेले पंधरा दिवस महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ सर्व स्तरातून बिनशर्त पाठिंबा मिळत आहे. त्यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करण्यासाठी महायुतीचे सर्व घटक पक्ष एकदिलाने काम करीत आहेत. जिल्हा परिषद पंचायत समिती विभागात बैठका घेऊन या त्या बैठकीना सभांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. दरम्यान, महायुतीचे घटक पक्ष असणारे मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे हे ४ एप्रिल रोजी कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोर नारायण राणे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेला येत आहेत. त्यांची सभा ही तोफा धडाडणारी असणार आहे. दरम्यान, या सभेच्या आदल्या दिवशी ३ एप्रिल रोजी उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होत आहे. या सभेत त्यांनी मोदीविरोधी नारायण राणे विरोधी राजकारण केले असेल तसेच महायुतीच्या उमेदवारांवर आरोप प्रत्यारोप केल्यास भारतीय जनता पार्टी ४ एप्रिलच्या सभेत अंगावर आल्यास शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नसल्याचा स्पष्ट इशारा प्रभाकर सावंत यांनी दिला. यावेळी मनसे जिल्हा अध्यक्ष धीरज परब म्हणाले की, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा प्रचार उत्साहात सुरू आहे. गावपातळीवर प्रचाराच्या दोन फेऱ्या पूर्ण झाल्या असून सर्व कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने एक दिलाने काम करत आहेत.
