रवींद्र पाताडे यांचे प्रतिपादन ः कासार्डे विद्यालयात बालसंस्कार शिबिराचे उद्घाटन..
⚡कणकवली ता.२६-: मुलं हीच आपली खरी संपत्ती आहे. बालवयात मुलांना योग्य मार्गदर्शन आणि योग्य संस्कार मिळणे गरजेचे बनले आहे.लहान मूलं ही मातीच्या गोळ्याप्रमाणे जसं वळण लावू तशाप्रकारे घडत जातात, कोणतेही चांगले विचार आणि संस्कारांचे प्रतिबिंब आपणास मुलांच्या बोलण्या-वागण्यातून दिसून येतात.म्हणून भावी पिढी संस्कारक्षम होण्यासाठी अशी ‘बालसंस्कार शिबिरे’ आयोजित होणे काळाची गरज बनली आहेत, असे प्रतिपादन कासार्डे विकास मंडळ मुंबईचे पदाधिकारी रवींद्र पाताडे यांनी केले.
कासार्डे विकास मंडळ, मुंबई संचलित कासार्डे माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय कासार्डे येथे आयोजित करण्यात आलेल्या पाच दिवसीय ‘मोफत बालसंस्कार शिबिराच्या उद्घाटन सोहळ्यात पाताडे बोलत होते. यावेळी माजी सैनिक तथा संस्था पदाधिकारी रवींद्र पाताडे,सहदेव मस्के,प्रकाश तिर्लोटकर, मुख्याध्यापक एन.सी. कुचेकर, पर्यवेक्षक एस.डी.भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रकाश तिर्लोटकर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांवर चांगले संस्कार झाल्यामुळे त्यांच्याहातून महान कार्ये झाल्याचा दाखला देत मोबाईलपासून दूर राहण्यासाठी अशी शिबीरे महत्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक एन.सी कुचेकर यांनी केले.
सूत्रसंचालन प्रा.आर.व्ही.राऊळ यांनी केले. आभार एस.डी.भोसले यांनी मानले. दरम्यान, या शिबिराला कासार्डे दशक्रोशीतील ६ ते १३ वयोगटातील ७० पेक्षा अधिक मुलांनी सहभाग दर्शविला आहे. बालसंस्कार शिबिरात विविध मनोरंजक खेळ, विस्मृतीत गेलेले बालपणीचे खेळ,आईस ब्रेकिंग,खेळातून विज्ञान, ज्युडो कराटे,थ्रीडी शो, योगासने, हसत खेळत इंग्रजी, मनोरंजनात्मक प्रयोग, रंगावली, कलावर्ग , विविध गुणदर्शन, वैदिक गणित,स्टेम लर्निंगयासारख्या अनेक कलागुणांचे तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली सलग पाच दिवस अभ्यासाव्यतिरिक्त शिक्षण दिले जाणार आहे.