खा. विनायक राऊत यांचा आरोप ः फोंडाघाट येथे मविआची सभा..
कणकवली ः रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी साखर कारखाना न काढल्याने येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची हेळसांड झाली. परिणामी जिल्ह्यातील ऊस शेतीही कमी झाली. लघु, सुक्ष्म, मध्यम खात्याचे जिल्ह्यातील पहिले लाभार्थी राणे आहेत, अशी टीका रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मविआचे उमेदवार तथा खासदार विनायक राऊत यांनी केली. फोंडाघाट येथे महाविकास, इंडिया आघाडीच्या सभेत श्री. राऊत बोलत होते.
यावेळी शिवसेना उबाठा गटाचे उपनेते गौरीशंकर खोत, संजना घाडी, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत, जिल्हा संपर्कप्रमुख अतुल रावराणे, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, आपचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर, उबाठा शिवसेना महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, महिला तालुकाप्रमुख माधवी दळवी, तालुकाप्रमुख डॉ. प्रथमेश सावंत, माजी तालुकाप्रमुख आबू पटेल, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर, संजय घाडी, दत्ताराम फोपे, काशीराम राणे, संजना कोलते, काँग्रेस कार्यकर्ते संतोष टक्के, अरुण म्हसकर आदी उपस्थित होते.
नारायण राणे यांनी प्रत्येक निवडणुकीत ‘कोकणच्या विकासासाठी पुन्हा एकदा निवडून द्या’ असे म्हणत निवडणुका जिंकल्या व स्वत:च्या विकास केला, याची कित्येक उदाहरण आहेत. राणे 1999 साली महसुलमंत्री होते तेव्हा कणकवली तालुक्यातील बेळणे येथे ऑइल मिल सुरू करण्याचे त्यांनी आश्वासन दिले. त्यासाठी कासार्डे, सांगवे, लोरे, ओझरम, वाघेरी या गावातील जवळपास 500 एकर जागेवर शेतकऱ्यांना पामतेलाची झाडाची लागवड करावयास लागली. मात्र, ही ऑइल मिल आजतागायत सुरू झाली नाही. येथील ऊस शेतकऱ्यांचा त्रास कमी करण्यासाठी काँग्रेसचे माजी आमदार विजय सावंत हे शेकडो कोटी रुपये खर्च करून साखर कारखाना काढणार होते. पण, नारायण राणे यांनी स्वत:च्या साखर कारखाना झाला पाहिजे, अशी भूमिका घेऊन विजय सावंत यांचा होणारा साखर कारखाना रद्द करायला लावला. मात्र, राणेंनी साखर कारखाना न काढल्याने येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची हेळसांड झाली. परिणामी जिल्ह्यातील ऊस शेतीही कमी झाली असल्याचे राऊत म्हणाले. यावेळी अन्य मान्यवरांनीही मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन उबाठा शिवसेनेचे उपतालुकाध्यक्ष राजू रावराणे यांनी केले. सभेला महाविकास, इंडिया आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.