राणेंच्या टीकेला आमदार वैभव नाईकांचे प्रत्युत्तर:नीलेश राणेंनी किती खालच्या शब्दांत भाषण केले, हे जनतेने पाहिले..
कणकवली ः केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी खासदार विनायक राऊत यांचे शिक्षण काढण्यापेक्षा आपले शिक्षण किती होते, आपण नोकरीत असताना कोणत्या हुद्दयावर होता, याची जाणीव राणेंना असली पाहिजे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाला बॅ. नाथ पै, मधू दंडवते, सुरेश प्रभू यांच्या विचारांची परंपरा आहे. या परंपरेचा वारसापुढे नेते विनायक राऊत हे दोन वेळा या मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले आहेत, असे प्रत्युत्तर आमदार वैभव नाईक यांनी राणेंच्या टीकेला दिले आहे.
राऊत यांनी लोकसभेच्या अधिवेशनामधील चर्चेत सहभाग घेतला आहे. अधिवेशन काळातील प्रश्नोतराच्यावेळी एका खासदाराने विचारलेल्या प्रश्नाला राणेंनी काय उत्तर दिले, सर्व जनतेने पाहिलेले आहे. राणेंनी आपल्या मुलांची तुलना ही बॅ. नाथ, मधू दंडवते, सुरेश प्रभू यांच्याशी केली आहे, ही तुलना म्हणजे कहरच आहे. राणेंच्या मुलांनी कुठे शिक्षण घेतले त्यांना माहित आहे. त्यांनी जर शिक्षण घेतले असेल तर दादागिरी, दमदाटी करणे हे संस्कार त्यांच्यावर झाले नसते, असा टोला नाईकांनी लगावला.
गुहागर येथील सभेत नीलेश राणेंनी किती खालच्या शब्दांत भाषण केले, हे जनतेने पाहिलेले आहे. त्यामुळे राणेंनी आपल्या मुलांचा इतिहासही बघितला पाहिजे. विनायक राऊत यांचे शिक्षण काढताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शिक्षण किती आहे, त्यांनी घेतलेली पदवी खोटी की खरी आहे याची शहानिशा राणेंनी करावी, असा टोला नाईकांनी लगावला.