बांदा/प्रतिनिधी
राधारंग फाऊंडेशन परूळेच्या वतीने स्वर्गीय वसंतराव सरनाईक स्मृती गणित – विज्ञान शिष्यवृत्ती (इयत्ता नववी साठी) २०२३ परीक्षेत विशेष प्रावीण्य संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना मळगाव येथे रोख पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी राधारंग फाऊंडेशनचे उपाध्यक्ष ॲड. पी. डी. देसाई, कार्यकारी मंडळाच्या ज्येष्ठ सदस्या अरूणा सामंत, अध्यक्ष हेमंत खानोलकर, डॉ. उदय रमाकांत खानोलकर वाचनालायचे उपाध्यक्ष महेश पंत वालावलकर, वनिता सामंत, मंडळाचे जेष्ठ सदस्य गुरुनाथ नार्वेकर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. नुतन माध्यमिक विद्यालय इन्सुलीचे जितेश गोकुळदास पोपकर प्रथम पारितोषिकाचा मानकरी ठरला. रेश्मा संदेश पालव हिने शिष्यवृत्ती परीक्षेत द्वितीय क्रमांक पटकावला तर भृंजल दिनेश गावडे व अमेय प्रसाद सावंत यांना तृतीय पारितोषिक विभागून देण्यात आले.
(कै.) प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर मळगावच्या रमाकांत सूर्याजी खानोलकर सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला विद्यार्थी वर्ग, पालक आणि राधारंग फाऊंडेशनचे सदस्य व हितचिंतक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरुणा सामंत यांनी केले तर सूत्रसंचालन गुरूनाथ नार्वेकर यांनी केले.
फोटो :-
मळगाव येथे आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा गौरव करताना मान्यवर.
गणित, विज्ञान शिष्यवृत्ती स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान…
