सरत्या वर्षात ढोबळ नफ्यात १०० कोटींच्यावर मारली मजल:अध्यक्ष मनीष दळवी यांनी २०२३-२४ चा मांडला प्रगती अहवाल..
ओरोस ता २
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेने ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या २०२३-२४ या आर्थिक वर्षात बँकेच्या आर्थिक प्रगतीचा आलेख सातत्याने उंचावताना ठेवी, कर्जे, एकूण व्यवसाय, स्वनिधी, कर्जवसुली, ढोबळ व निव्वळ नफा इत्यादीमध्ये लक्षणीय प्रगती केलेली आहे. बँकेने या आर्थिक वर्षात ढोबळ नफ्यात १०० कोटींच्या वर मजल मारली आहे. १०० कोटी २६ लाख ढोबळ नफा मिळविला आहे. ही बँकेच्या इतिहासातील ऐतिहासिक कामगिरी आहे, अशी माहिती बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिली आहे.
२०२३-२४ या आर्थिक वर्षातील जिल्हा बँकेच्या प्रगतीची माहिती देण्यासाठी अध्यक्ष दळवी यांनी मंगळवारी सिंधुदुर्गनगरी येथील बँकेच्या प्रधान कार्यालयाच्या सभागृहात पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब डोईफोडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, संचालक निता राणे, समीर सावंत, आत्माराम ओटवणेकर, प्रकाश मोर्ये आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना अध्यक्ष दळवी यांनी, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही महाराष्ट्रातील एक अग्रगण्य बँक असून, या बँकेच्या जिल्हयामध्ये ९८ शाखा कार्यरत आहेत. बँकेमार्फत नियमित बँकिंग सेवांसह आर टी जी एस, एन ई एफ टी, ए टी एम, मोबाईल ॲप, आय एम पी एस, यू पी आय, ई – कॉम, क्यू आर कोड, ए बी पी एस, बी बी पी एस, मायक्रो ए टी एम, सी टी एस, ई मेल अकाऊंट स्टेटमेंट इत्यादी आधुनिक बँकिंग सुविधा पुरविण्यात येत आहेत. कोणत्याही वित्तीय संस्थेच्या यशस्वीततेचे मोजमाप हे त्या संस्थेच्या विविध आर्थिक मापदंडावरून निश्चित होत असते. यात जिल्हा बँकेने कोकण विभागातील रत्नागिरी, रायगड जिल्हा बँकेने मागे टाकण्याचे काम केले आहे.
बँकेच्या इतिहासात पहिल्यांदाच १०० कोटीच्यावर बँकेचा ढोबळ नफा गेलेला आहे. मागील ३१ मार्च २०२३ अखेर बँकेचा ढोबळ नफा ९०.७२ कोटी एवढा होता. त्यामध्ये ९.५४ कोटीने वाढ होवून ३१ मार्च २०२४ अखेर बँकेचा ढोबळ नफा १००.२६ कोटी रुपये एवढा झालेला आहे. तर बँकेचा निव्वळ नफा ३१ मार्च २०२३ अखेर २०.२१ कोटी होता. त्यामध्ये ५.७९ कोटीने भरीव वाढ होवून ३१ मार्च २०२४ अखेर बँकेचा निव्वळ नफा २६ कोटी एवढा झाला आहे. ३१ मार्च २०२३ अखेर बँकेच्या एकूण ठेवी २६०२.९२ कोटी होत्या. त्यामध्ये ३६९.८७ कोटीने वाढ होवून ३१ मार्च २०२४ अखेर एकूण ठेवी २९७२.७९ कोटी एवढ्या झालेल्या आहेत.
३१ मार्च २०२३ अखेर बँकेचा एकूण कर्जव्यवहार २२३५.१७ कोटी होता. त्यामध्ये १८२.९३ कोटीने वाढ होवून ३१ मार्च २०२४ अखेर एकूण कर्जव्यवहार २४१८.१० कोटी एवढा झाला आहे. बँकेचा एकूण व्यवसाय मार्च २०२३ अखेर ४८३८.०९ कोटी होता. बँकेने जुलै २०२३ अखेर ५००० कोटींचा टप्पा गाठलेला होता. गतवर्षीशी तुलना करता बँकेच्या एकूण व्यवसायामध्ये ५५२.८० कोटीची भरीव वाढ होवून मार्च २०२४ अखेर बँकेचा एकूण व्यवसाय ५३९०.८९ कोटी एवढा झालेला आहे. हा व्यवसाय चालू आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये ६ हजार कोटीच्यावर नेण्याचे बँकेचे उद्दिष्ट आहे. बँकिंग क्षेत्रामध्ये बँकांची आर्थिक सुदृढता ही भांडवल पर्याप्तता प्रमाणाच्या (CRAR) आधारे निश्चित होत असते. बँकेचे भांडवल पर्याप्तता प्रमाण ३१ मार्च २०२३ अखेर १०.८३ टक्के होते. त्यामध्ये ०.२२ टक्केने वाढ होवून ३१ मार्च २०२४ अखेर हे प्रमाण ११.०५ टक्के एवढे झाले आहे.
चौकट
कोणत्याही संस्थेचे स्वनिधी हे त्या संस्थेचा आर्थिक पाया असतो. स्वनिधीमध्ये बँकेचे भागभांडवल व नफ्यामधून वेळोवेळी उभारलेल्या राखीव व इतर निधींचा समावेश असतो. बँकेने स्वनिधी वाढीसाठी नेहमीच प्राधान्य दिलेले आहे. ३१ मार्च २०२४ अखेर बँकेच्या भागभांडवलामध्ये ३.०९ कोटी तर राखीव व इतर निधीमध्ये ७८.२७ कोटीने वाढ झाली असून बँकेच्या स्वनिधीमध्ये एकूण ८१.३६ कोटीने वाढ होवून ३१ मार्च २०२४ अखेर बँकेचे एकूण स्वनिधी ४८४.१३ कोटी एवढे झाले आहेत. बँकेचे खेळते भांडवल ३१ मार्च २०२३ अखेर ३३२८.७० कोटी एवढे होते. त्यामध्ये ४०६.९३ कोटी एवढी वाढ होवून ३१ मार्च २०२४ अखेर बँकेचे खेळते भांडवल ३७३५.६३ कोटी एवढे झाले आहे.
चौकट
बँकांकडील ढोबळ एनपीएचे आदर्श प्रमाण ५ टक्केच्या आत असणे आवश्यक असते. आपल्या बँकेचे ढोबळ एनपीएचे प्रमाण ३१ मार्च २०२३ अखेर ३.५६ टक्के एवढे होते. त्यामध्ये ०.०२ टक्केने घट होवून हे प्रमाण ३.५४ टक्के एवढे झालेले आहे. तर बँकेने निव्वळ एनपीएचे प्रमाण सातत्याने ०.०० टक्के राखले असून या वर्षी सुध्दा निव्वळ एनपीए प्रमाण ०.०० टक्के राहीले आहे. तसेच बँकेस विविध लेखापरिक्षणांमध्ये दरवर्षी सातत्याने ‘अ’ ऑडिट वर्ग प्राप्त होत आहे. यावर्षीही अ ऑडिट वर्ग प्राप्त होईल, असा विश्वास अध्यक्ष दळवी यांनी व्यक्त केला.
चौकट
बँकेच्या या यशस्वी घोडदौडीमध्ये बँकेच्या सभासद संस्थांबरोबरच बँकेचे संचालक मंडळ त्याचप्रमाणे या बँकेचे अधिकारी, कर्मचारी यांनी परिश्रमपूर्वक केलेल्या प्रयत्नांचा मोठा सहभाग आहे. बँकेचे ठेवीदार, ग्राहक यांचा बँकेवर असलेला विश्वास तसेच कर्जदारांनी कर्ज परतफेडीसाठी केलेले सहकार्य यामुळेच बँकेची उत्तरोत्तर प्रगती होत आहे. या सर्वाच्या सहकार्याशिवाय कोणत्याही आर्थिक संस्थेची प्रगती शक्य नसते. आपली जिल्हा बँकही त्याला अपवाद नाही. त्यामुळे जिल्हा बँकेशी संलग्न असलेल्या या सर्व घटकांचे बँकेचे अध्यक्ष या नात्याने मी मनःपूर्वक आभार व्यक्त करून बँकेचे यापुढील वाटचालीमध्येही सर्वाचे असेच सहकार्य लाभेल असा विश्वास व अपेक्षा व्यक्त केली आहे. हे यश केंद्रीयमंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, निलेश राणे, आ नितेश राणे यांच्या सहकार्यामुळे शक्य झाले असेही यावेळी दळवी यांनी सांगितले.
फोटो ओळ:- सिंधुदुर्गनगरी: पत्रकार परिषदेत बोलताना जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी सोबत मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब डोईफोडे व अन्य संचालक