लाखोंचे नुकसान:शासनाने लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी;बाबू देसाई यांची मागणी..
⚡कुडाळ ता.२५-: तालुक्यातील नेरुर देसाईवाडा येथील काजू बागायतदार बाबा देसाई, तातू देसाई, दत्ता देसाई आणि पद्मनाभ ठाकुर यांच्या काजू कलमांना २१ मार्च रोजी आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यात बाबा देसाई यांचा मांगर जळून खाक झाला. यात त्यांचे साधारण ७ लाखाचे नुकसान झाले.
नेरुर देसाईवाडा येथील काजू बागायतदार बाबा देसाई, तातू देसाई, दत्ता देसाई व पद्मनाभ ठाकूर यांच्या काजू कलमांना काही दिवसापूर्वी दुपारच्या वेळेत आग लागली होती. साधारण २५ एकर काजू क्षेत्र या आगीत जळून गेले. आग विझविण्यासाठी तेथील बागायतदारांनी व ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात धावपळ करीत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु, दुपारच्या वेळेत आग लागल्याने आगीने ्रौद्ररुप धारण केले होते. काजू बागेत जाण्यासाठी रस्ता नसल्याने अग्निशमन यंत्रणेची गाडी पोहोचू शकली नाही. त्यामुळे या आगीत मोठे नुकसान झाले. परंतु, तेथील ग्रामस्थांनी शर्तीचे प्रयत्न करीत आग आटोक्यात आणली. आग आटोक्यात येईपर्यंत या आगीत मोठ्या प्रमाणात काजू कलमे व बाबू देसाई यांचा मांगर जळून गेला होता. त्यामुळे या आगीत बाबू देसाई यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. शासनाने लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
