पिण्यायोग्य पाण्याच्या स्रोतांचे संवर्धन करणे आवश्यक…

वनपाल अमृत शिंदे: डॉक्टर एस. एस कुडाळकर हायस्कूल येथे जागतिक जल दिन कार्यक्रम संपन्न..

⚡मालवण ता.२३-: पाण्याची गरज नाही असे कोणतेच क्षेत्र आढळणार नाही. परंतु, एकंदरीत पाण्याचा अविचारी, अयोग्य, आणि अतिवापर होत असल्याचे काही दशकांपूर्वी जाणवले. गोड्या म्हणजे पिण्यायोग्य पाण्याचे निसर्गातील साठे अगदीच मोजके असल्याने त्याचा अत्यंत जपून वापर करणे, त्यांच्या स्त्रोतांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. पुरेसे पाणी मिळवण्यासाठी भविष्यात प्रचंड आटापिटा करावा लागणार आहे. पुढे येणाऱ्या या अडचणी लक्षात घेऊन आजपासूनच असे गंभीर प्रश्न सोडवण्याकडे सर्वांनीच लक्ष दिले पाहिजे, असे प्रतिपादन सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी वनपाल श्री. अमृत शिंदे यांनी केले.

राष्ट्रीय हरित सेना आणि सामाजिक वनीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण येथील डॉ. एस. एस. कुडाळकर हायस्कूल येथे आयोजित जागतिक जल दिन कार्यक्रमात संपन्न झाला. त्यावेळी श्री. शिंदे हे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी श्री. लटके, मालवण वनपाल संकपाळ साहेब, मुख्याध्यापिका सौ. साटलकर, शिक्षक सौ. शिंदे, खोत, बाणे आदी उपस्थित होते. मुख्याध्यापिका सौ. साटलकर यांनी सर्व अधिकाऱ्यांचे स्वागत केले.

यावेळी उपस्थित सर्व अधिकाऱ्यांनी जागतिक जल दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. श्री. लटके यांनी प्रशालेला कदंब वृक्ष देऊन पाणी अडवण्यासाठी वृक्षांचे असलेले योगदान अधिक स्पष्ट केले. तसेच होळीचा सण देखील पर्यावरण पूरक पद्धतीने साजरा करूया, अशी ग्वाही यावेळी विद्यार्थ्यांकडून घेण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.आठलेकर यांनी केले.

You cannot copy content of this page