आयुष्यात चांगले, सन्मानाने जगायचं असेल तर खूप शिका…

दशरथ चव्हाण:जीवनात आई, वडील व गुरुचरणी नेहमी लीन व्हावे…

⚡देवगड ता.१०-: विद्यालय म्हणजे विद्येचे माहेरघर. येथे वाकलात तर कायमचे ताठ मानेने जगाल. आयुष्यात चांगले, सन्मानाने जगायचं असेल तर खूप शिका. आगामी काळ हा स्पर्धेचा असून स्पर्धेला सामोरे जाण्यासाठी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, असे विचार देवगड – विजयदुर्ग पोलीस उपनिरीक्षक दशरथ चव्हाण यांनी व्यक्त केले.

क्षा. म. समाज मुंबई संचलित अध्यापक विद्यालय, मिठबाव, आर्ट्स कॉलेज मिठबाव येथील विद्यार्थ्यांना ते मिठबाव येथे आयोजित व्यक्तिमत्व विकास शिबिरादरम्यान बोलत होते.

व्यासपीठावर प्राचार्य भालचंद्र चव्हाण, प्रा. माधुरी तांबे, प्रा. लोके, यांसह सर्व अध्यापकाचार्य उपस्थित होते.

कार्यक्रमात बोलताना दशरथ चव्हाण पुढे म्हणाले, जीवनात आई, वडील व गुरुचरणी नेहमी लीन व्हावे. तेच जगण्याचा रस्ता दाखवितात. जीवनात आपल्याला आई – बाबा व गुरु हे संस्कारांची शिदोरी प्रदान करत असतात. म्हणून आपल्या वागण्यातून कधीच त्यांना दुखवू नका. आपले कधीच चुकीचं पाऊल पडणार नाही, असं वागा. आपल्या घरातील वयोवृद्ध व्यक्तींना आधार द्या. मोबाईलच्या आहारी जाऊ नका. आपल्या कुटुंबालाही वेळ द्या,. परिवारात गप्पा मारत जावा. जीवन जगण्याची कला समजून घ्या, स्वार्थी लोकांपासून सावध राहा, त्यांवर विश्वास ठेवू नका, कितीही मोठे झालात तरी आई, वडील आणि आपल्या गावाला विसरू नका. आपल्या कमाईचा काही वाटा अनाथ व गरीबांना दान करा, कर्म चांगले ठेवा, असे मौलिक विचार त्यांनी व्यक्त करून जीवनात एक आदर्श नागरिक बना, असेही आवाहन श्री. चव्हाण यांनी केले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्राचार्य बी. के. चव्हाण यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. माधुरी तांबे यांनी केले.

You cannot copy content of this page