सिंधुदुर्गनगरीत परवा अत्याधुनिक उद्योग प्राद्योगिक केंद्राची मंत्री राणेंच्या हस्ते पायाभरणी…

१६५.२८ कोटींची गुंतवणूक:वर्षाला दहा हजार युवकांना मिळणार प्रशिक्षण..

ओरोस ता.०९-:

कोकणातील नव उद्योजकांना घडविण्यासाठी व विकासाला गती देण्यासाठी भारत सरकारचे आधुनिक उद्योग प्रोद्योगिक केंद्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात सिंधुनगरीत होत आहे. या प्रशिक्षण केंद्रावर १६५.२८ कोटी रुपये भारत सरकार खर्च करणार आहे. केंद्रीय लघु, सूक्ष्म आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी हे केंद्र मंजूर केले आहे. याचा पायाभरणी कार्यक्रम सोमवारी सकाळी ११ वाजता सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हाधिकारी कार्यालय नजिक केंद्रीयमंत्री राणे यांच्याहस्ते होणार आहे, अशी माहिती एम एस एम ई मंत्रालयाचे नागपूर येथील संचालक पी एम पार्लेवार यांनी येथील पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत पार्लेवार बोलत होते. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, विभागाचे सहाय्यक संचालक राहुलकुमार मिश्रा, भाजपच्या महिला अध्यक्षा सुप्रिया वालावलकर, संतोष वालावलकर आदी उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना पार्लवार यांनी, पीएम विश्वकर्मा ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना देशभर राबविली जात आहे. या योजनेला आणखी बळकटी देण्यासाठी सिंदुर्गातील तरुण-तरुणींना आधुनिक प्रशिक्षण देणाऱ्या या प्रशिक्षण केंद्राचा भूमिपूजन सोहळा केंद्रीय सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते सोमवार दिनांक 11 मार्च रोजी सिंधुदुर्गनगरी येथे होत आहे. अशी माहिती यावेळी देण्यात आली.

You cannot copy content of this page