जळाऊ लाकूड साठ्याचे मात्र नुकसान : माडाचेगाळू, केणीवाडा येथील घटना..
⚡बांदा ता.२८-: पाडलोस माडाचेगाळू येथे मंगळवारी दुपारी 4 वाजताच्या दरम्यान शॉर्टसर्किटमुळे आग लागून तुकाराम गावडे यांचे नुकसान झाले. वाऱ्याचा वेग असल्याने आग घरापासून अवघ्या चार फूट अंतरावर आली होती. मात्र ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे आग रोखण्यात आली अन पुढील अनर्थ टळला. तर केणीवाडा येथे लागलेल्या आगीतून बैल जोडी वाचविण्यात यश आले.
माडाचेगाळू येथे सलग चौथ्यावर्षी शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली. विद्युत वाहिन्या एकमेकांना घर्षण होऊन शॉर्टसर्किट झाले व त्याची ठिणगी सुक्या गवतावर पडली. दुपारची वेळ असल्याने वाऱ्याच्या झोकात आग घराजवळ पोहोचली. घरातील मंडळी झोपी गेली होती. परंतु आग लागल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी तात्काळ धाव घेतली व घरापासून अवघ्या चार फुटावर आग रोखण्यात आली. यावेळी परिसरात असलेला डंपर तात्काळ बाजूला करण्यात आला. आगीत तुकाराम गावडे यांचे दोन टेम्पो जळाऊ लाकूड मात्र जळून खाक झाले. सदर आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. आग विझविण्यासाठी चंद्रकांत नाईक, सखाराम गावडे, मुकुंद गावडे, चंद्रकांत शेटकर, गुणाजी गावडे, जानकी गावडे, अनुजा गावडे, दुर्गावती गावडे, शेवंता राऊळ यांनी शर्तीचे प्रयत्न केले.
