प्रभाकर सावंत यांची माहिती: गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत राहणार उपस्थिती..
⚡सावंतवाडी ता.२६-: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात २८ रोजी बुथ कार्यकर्ते महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी आज येथे दिली. दरम्यान या महासंमेलनालत सात प्रकारचे विविध कार्यक्रम होणार असून यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे उपस्थित राहून सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत, असे श्री सावंत यांनी यावेळी सांगितले. ते सावंतवाडीतील भाजप मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी श्री प्रभाकर सावंत पुढे बोलताना म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्ली येथे गेल्या आठवड्यात भाजपचे राष्ट्रीय अधिवेशन पार पडले. यावेळी 11000 भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते. भाजपच्या बड्या नेत्यांनी मार्गदर्शन करून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या वतीने काही क्लस्टर केले. यात रायगड मावळ रत्नागिरी सिंधुदुर्ग असे तीन लोकसभा मतदारसंघाचा एक क्लस्टर तयार करून लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे कार्यक्रम घ्यायचे आहेत ते या माध्यमातून घेण्यात येणार आहेत. त्यानुसार 28 रोजी सावंतवाडी येथे बुथ कार्यकर्ते महासंमेलन घेण्यात येणार आहे. यावेळी 4000 बुथ कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. तसेच विविध सेलचे पदाधिकारी देखील यावेळी उपस्थित राहणार असल्याचे देखील श्री सावंत यांनी यावेळी सांगितले.
यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली, भाजप जिल्हा उपाध्यक्ष संजू परब, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, अमित परब आदी उपस्थित होते.
