विज्ञानवादी दृष्टीकोन वाढविण्यासाठी प्रयत्न:अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या शुभेच्छा..
ओरोस ता.२०-:समग्र शिक्षा अंतर्गत राष्ट्रीय आविष्कार अभियान २०२३-२४ या उपक्रमांतर्गत राज्याबाहेर इस्त्रो अभ्यासासाठी सहलीचे जिल्हा परिषदेच्यावतीने आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या प्रगत शाळांतील अध्ययन निष्पत्ती सर्वोत्तम असलेल्या सहावी आणि आठवी वर्गातील प्रत्येकी दहा विद्यार्थ्यांची निवड यासाठी करण्यात आली आहे.
२० ते २५ फेब्रुवारी या कालावधीत कर्नाटक राज्यातील विश्वेश्वरा औद्योगिक आणि तंत्रज्ञान संग्रहालय, क्युबन पार्क आणि बंगलोर पॅलेस विधान सौदा बंगलोर आणि प्राणिसंग्रहालय या ठिकाणांना हे विद्यार्थी भेट देणार आहेत. यासाठी सर्व २० विद्यार्थ्यांना मंगळवारी जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात कार्यक्रमाद्वारे शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी व्यासपीठावर लेखा व वित्त अधिकारी बाळासाहेब पाटील, दीपक केसरकर मित्र मंडळाचे अध्यक्ष राजन पोकळे, शिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर, समग्र शिक्षाच्या जिल्हा समन्वयक स्मिता नलावडे, रामचंद्र आंगणे, नंदू गावडे, प्रवीण शेवडे, सुरज परब आदी यावेळी उपस्थित होते.
