वाळू प्रश्नी गावाबाहेरिल व्यक्तीला घेवून करतायत व्यवसाय;रेवंडीतील शिवसैनिक राजिनाम्याच्या पवित्र्यात:प्रसिद्धि पत्रकाद्वारे दिली माहिती
*💫मालवण दि.२०-:* वाळू व्यवसायाच्या माध्यमातून एकत्र येत रोजगार मिळविणाऱ्या रेवंडी ग्रामस्थांच्या पाठीशी शिवसेना ठाम पाठीशी राहील असे आश्वासन जाहीर कार्यक्रमात देणाऱ्या खास. विनायक राऊत व पालकमंत्री उदय सामंत यांच्या शब्दाला शिवसेनेच्याच एका जिल्हा पदाधिकाऱ्याने हरताळ फासत गावाबाहेरील धनाढ्य वाळू व्यावसायिकांना घेऊन रेवंडीत वाळू व्यवसाय करून स्थानिक ग्रामस्थ व शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये दहशत निर्माण करत असल्याचा आरोप केला आहे. स्वार्थासाठी शिवसेनेचेच जिल्हा पदाधिकारी आमच्या गावातील शिवसैनिकांच्या आणि ग्रामस्थांच्या धंद्यावर पर्यायाने पोटावर उठले असल्याने रेवंडी मधील सर्व शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते राजीनामा देणार आहेत, असे रेवंडी शिवसेना शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे. रेवंडी येथील शिवसेना शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात भद्रकाली मंदीरात शिवसेनेच्या खासदार व पालकमंत्री यांनी ग्रामस्थांना दिलेला शब्द एका जिल्हा पदाधिकाऱ्याने पाळला नाही असा आरोप करण्यात आला आहे. दोन महिन्यांपूर्वी रेवंडी येथे झालेल्या बीएसएनएल टॉवरच्या उद्घाटनप्रसंगी खासदार विनायक राऊत व पालकमंत्री उदय सामंत यांनी गावातील सर्व वाळूव्यावसायिकांच्या पाठीशी उभे राहण्याचे आश्वासन दिले होते. संपूर्ण गाव एकत्रीत येवून वाळू व्यवसाय करत असल्याने गावाबाहेरील अन्य कोणत्याही वाळूव्यावसायिकास रेवंडी येथे वाळूव्यवसाय करायला न देता गावातील एकत्रीत येवून रोजगार मिळवणाऱ्या ग्रामस्थांच्या पाठीशी उभे राहू असा शब्दच खा.विनायक राऊत व पालकमंत्री उदय सामंत यांनी भद्रकाली मंदिर येथे बोलताना दिला होता. पालकमंत्री यांनी ग्रामस्थांना पाठीशी राहील्यास सर्वांना सांभाळण्याची जबाबदारी देखील यावेळी घेतली होती. त्यामुळे संपुर्ण गावानेच शिवसेनेला जाहीर पाठींबा देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र गावाबाहेरील धनाढ्य वाळूव्यावसायिक व शिवसेनेचा एक जिल्हा पदाधिकारी मिळून रेवंडी येथे येऊन वाळूव्यवसाय करत आहेत. रेवंडी येथील एका ज्येष्ठ शिवसैनिकाने आपल्या जागेतून डंपर वाहतूक करण्यास विरोध करुन देखील हे बाहेरील पदाधिकारी दमदाटी करुन कांबळी यांच्या जागेतुन अतिक्रमण करत आहेत. तसेच गावात येऊन हे जिल्हा पदाधिकारी स्थानिक ग्रामस्थ व शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये दहशत निर्माण करत आहे, असा आरोप रेवंडी मधील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी या प्रसिद्धीपत्रकात केला आहे. शिवसेनेच्या पडत्या काळात रेवंडीतील आम्ही शिवसैनिकांनी शिवसेनेची साथ कधीही सोडली नाही. मात्र, स्वत:च्या वैयक्तीक स्वार्थासाठी आमच्याच पक्षाचे हे जिल्हा पदाधिकारी आमच्याच स्थानिक गावातीत शिवसैनिक व ग्रामस्थांच्या धंद्यावर व पोटावर उठले असतील तर आमच्याकडे राजीनामा हा एकमेव पर्याय असल्याचे रेवंडी शिवसेना शाखेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्यावतीने या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
