सत्ताधारी पक्षात लवकरच प्रवेश करणार…

परशुराम उपरकर:माजी आमदार परशुराम उपरकर यांचे सूतोवाच;कार्यकर्ते कोणत्या सत्ताधारी पक्षात जायचे हे ठरवतील..

⚡कुडाळ ता.१८-: आपणच मनसेला सोडचिठ्ठी देणार होतो, असे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी स्पष्ट करीत राज्यातील सत्ताधारी पक्षात लवकरच प्रवेश करणार असल्याचे सूतोवाच आज परशुराम उपरकर यांनी केले. याबाबत आपल्या बरोबरचे कार्यकर्ते कोणत्या सत्ताधारी पक्षात जायचे हे ठरवतील, असेही उपरकर म्हणालेत. तसेच पक्षप्रवेशाबाबत येत्या १५ दिवसात निर्णय होईल, असे उपरकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
कुडाळ येथे माजी आमदार परशुराम उपरकर समर्थकांचा भव्य मेळावा आज पार पडला. यावेळी शेकडो उपरकर समर्थक उपस्थित होते.
माजी आमदार परशुराम उपरकर म्हणाले की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून आपण पक्षाचे काम केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तळागाळापर्यंत तसेच आजच्या युवापिढीपर्यंत पक्षाची ध्येय आणि धोरणे पोहचविण्यास पक्षासाठी आपण झोकून काम केले. पक्षप्रमुख राज ठाकरे यांचे विचार जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम केले. परंतु, पक्षाकडून मागील काही वर्षात आम्हाला पूर्णतः दुर्लक्षित ठेवण्यात आले. मात्र, मागील एक-दोन वर्षात पक्षांचे जे सक्रिय कार्यकर्ते होते त्यांच्यावर केवळ द्वेषपोटी पक्ष निरीक्षकांनी कारवाई केली आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांना बाजूला करण्याचे काम पक्षातील पदाधिकाऱ्यांनी केले. पक्षात मनमानी कारभार सुरू असून ही आता प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाली आहे. त्यामुळे आम्ही शैक्षणिक राजीनामे दिलेत. आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांची सेवा करण्यासाठी सत्तेत जाणार असल्याचे वक्तव्य परशुराम उपरकर यांनी यावेळी केले.

कोणत्या पक्षात जाणार हे लवकरच ठरेल
उपरकर म्हणाले की, राज्यात सत्तेत असलेल्या पक्षात आम्ही प्रवेश करू. परंतु, या संदर्भात माझे निष्ठावान कार्यकर्ते जे सांगतील त्या पक्षात प्रवेश होईल. जिल्ह्यातील लोकांची सेवा करण्यासाठी सत्तेत जाऊन काम करणे आवश्यक आहे. येत्या १५ दिवसात याबाबत निर्णय होईल.
आम्ही मनसेवर आता कोणतीही टीका करणार नाही. मनसेने जनतेची कामे करावीत आणि आपला पक्ष वाढवावा. मात्र, आता आमच्या कार्यकर्त्यांना धमक्या येत आहेत. जे निरीक्षक येत आहेत त्यांनी आता आमच्यावर टीकाटिप्पणी करू नये. आम्ही तुमच्यासोबत फारकत घेतली आहे. आमच्या कोणत्याही कार्यकर्त्याला दम भरल्यास माझे कार्यकर्ते समर्थ असतील. मुख्य म्हणजे काही पक्षातील कार्यकर्ते सुद्धा आमच्या पक्षात येण्यास उत्सुक आहेत.

यावेळी प्रसाद गावडे, विनोद सांडव,आशिष सुभेदार, बाबल गावडे, आपा मांजरेकर, मंदार नाईक, दीपक गावडे, आदेश सावंत, राजेश टंगसाळी, आबा चिपकर, प्रकाश साटेलकर, बाळकृष्ण ठाकूर, प्रतीक कुबल, संदीप लाड, अमोल जंगले, अभय देसाई, सत्यविजय कविटकर, सदाशिव गुरव, सुंदर गावडे, दत्ता गावडे, विजय जांभळे, गुरू मर्गज यासंह ५०० ते ६०० माजी पदाधिकारी व कार्यकर्ते निर्धार मेळाव्याला उपस्थित होते.

You cannot copy content of this page