Headlines

महाराष्ट्र हा लोककला व सण, उत्सवांना महत्व देणारा…

पालकमंत्री रवींद्र चव्हाण:जिमखाना मैदानावर पर्यटन व सांस्कृतिक महाराष्ट्र राज्य व जिल्हा प्रशासन आयोजित सिंधू महासंस्कृती महोत्सवाच्या थाटात उद्घाटन..

⚡सावंतवाडी ता.०६-:
महाराष्ट्र हा लोककला व सण, उत्सवांना महत्व देणारा आहे‌. येथील लोक उत्साही आहे. आपली संस्कृती जपताना ते पहायला मिळतात. इथल्या रूढी, परंपरा जपण्याच काम पिढ्यानपिढ्या सुरु आहे. अशा महोत्सवांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या प्रथा परंपरा जपण्याचे काम महाराष्ट्र शासन करीत आहे, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांनी केले.

सावंतवाडी येथील जिमखाना मैदानावर पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र राज्य व जिल्हा प्रशासन सिंधुदुर्ग आयोजित सिंधू महासंस्कृती महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, आमदार नितेश राणे, जिल्हाधिकारी किशोर तावडे, मुख्यकार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, माजी आमदार राजन तेली, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, माजी नगराध्यक्ष संजू परब, तहसीलदार श्रीधर पाटील आदी उपस्थित होते.
मंत्री चव्हाण म्हणाले, कोरोनासह मध्यल्या आघाडी शासनाच्या काळात सांस्कृतिक चळवळीवर परिणाम झाला होता. त्यावेळी आपला समाज मानसिक तणावाखाली होता‌. परंतु, युती सरकार महाराष्ट्रात आल्यानंतर लोकांच्या मनातील गोष्टी होऊ लागल्या. सर्व सण, उत्सवांवरील निर्बंध उठवले गेले. सार्वजनिक गणेशोत्सवातील गणेश मुर्तींवर निर्बंध टाकण्याच काम मागच्या सरकारन केलं. हे निर्बंध उठवण्याच काम शिंदे-फडणवीस सरकारनं केलं. खऱ्या अर्थानं आनंद देण्याच काम आमचं सरकार करत आहे. मैदानी खेळ, सांस्कृतिक कार्यक्रमातून हे कार्य केलं जातं आहे‌. समाजातील मानसिक तणाव दुर करण्यासाठी हे सरकार कार्यरत आहेत.

सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासाठी विशेष मेहनत घेतली आहे. सांस्कृतिक मेळावा उभं करण्याच काम प्रशासनाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात होत आहे. सिंधुदुर्ग हा कलावंतांचा जिल्हा आहे. दशावतारासारख्या कला या जिल्ह्यात जपल्या जात आहेत. हीच परंपरा या महोत्सवाच्या माध्यमातून जतन केली जात आहे. आगामी काळातही याच महोत्सवाचा भाग म्हणून राम मंदिर उभारणीचा इतिहास सांगणारे ‘ अयोध्या ‘ हे महानाट्य प्रत्येक पंचक्रोशीत आयोजित केले जावे, अशा सूचना त्यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या.

You cannot copy content of this page