शासनाने किमान २०० रुपये हमीभाव काजू बी ला जाहीर करावा…

विलास सावंत यांची पालकमंत्र्यांकडे मागणी: अन्यथा सर्व शेतकरी संघटना १० फेब्रुवारी रोजी एकाच वेळी करणार धरणे आंदोलन…

⚡बांदा ता.०२-: काजू हे कोकणातील शेतकऱ्यांचे मुख्य उत्पन्नाचे साधन आहे. मात्र काजू बी ला राज्य शासनाने हमीभाव न दिल्याने शेतकऱ्यांवर कवडीमोलाने काजू बी विकण्याची पाळी येते. सिंधुदुर्गातील काजू बीला जीआय मानांकन मिळाले असून शासनाने किमान २०० रुपये हमीभाव जाहीर करावा अशी मागणी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. अन्यथा सिंधुदुर्ग, कोल्हापूर व रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटना १० फेब्रुवारी रोजी एकाच वेळी धरणे आंदोलन, लाक्षणिक उपोषण व आमरण बेमुदत उपोषण करतील असा इशारा सावंतवाडी – दोडामार्ग शेतकरी व फळबागायतदार संघाचे अध्यक्ष विलास सावंत यांनी बांदा येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला.

       सावंतवाडी दोडामार्ग शेतकरी व फळबागायतदार संघाच्या कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रगतशील शेतकरी नितीन मावळणकर, करमळकर सर, एस.टी. सावंत, कळणे सरपंच अजित देसाई, जनार्दन नाईक, वैभव मुरुडकर, सातुळी सरपंच दिना कशाळीकर, विश्वनाथ गवस उपस्थित होते.

     यावेळी विलास सावंत म्हणाले, दापोली कृषी विद्यापीठाने सन २०२० मध्ये काजूचा उत्पादन खर्च प्रति किलो १२२.५० रुपये असल्याचा अहवाल दिला होता. यात प्रत्येक मजुराची मजुरी २३९ रुपये धरलेली आहे. मात्र प्रत्यक्षात ५०० रुपये पुरुष व ३०० रुपये महिला अशी मजुरीची स्थिती आहे. सिंधुदुर्गातील काजू बीला जीआय मानांकन प्राप्त असून किमान २०० रुपये हमीभाव शासनाकडून मिळणे आवश्यक आहे.

        गोवा शासनाने मार्च २०२३ मधील बजेटमध्ये काजू बिला १५० रुपये हमीभाव जाहीर करून प्रत्यक्षात कार्यवाही सुरू केली आहे. जिल्ह्यातील कारखानदार ४० टक्के सिंधुदुर्गातील काजूगर व ६० टक्के परकीय काजूगर मिक्स करून पॅकेट बनवतात व सिंधुदुर्गातील काजूगर म्हणून विकतात. ही ग्राहकांची फसवणूक असून कारखानदारांना इम्पोर्टेड व सिंधुदुर्ग जीआय काजूगर याचा उल्लेख पॅकिंगवर करण्यास बंधनकारक करावे अशी मागणी केली.

     काजू बी चा दर कमी असूनही काजूगराच्या दराचा आलेख मात्र चढता आहे. जीआय मानांकित भागात निकृष्ट चवीची परकीय काजू बी आयात करणे हे जीआय निकषाच्या विरोधात आहे. परकीय काजू बी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू बी मधील घटकद्रव्य व चव वेगळी आहे. परकीय काजूगरात शेंगदाण्यातील घटकद्रव्यांशी साधर्म्य आहे. आपल्या काजूगरामध्ये हाय प्रोटीन्स व विटामिन्स असून चवही उत्कृष्ट आहे.

      शासनाने काजू बीला किमान २०० रुपये हमीभाव द्यावा अशी पालकमंत्री ना. रवींद्र चव्हाण यांच्याकडे मागणी केली आहे. अन्यथा सिंधुदुर्ग, कोल्हापूर व रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटना १० फेब्रुवारी रोजी एकाच वेळी लाक्षणिक उपोषण करतील असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

You cannot copy content of this page