असलदे सरपंच पंढरी वायंगणकर यांचा इशारा; असलदे ते कोळोशी रस्ता वाहतुकीस धोकादायक..
*💫कणकवली दि.२५-:* देवगड-निपाणी राज्यमहामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. असलदे ते कोळोशी या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघात होत आहेत. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्क साधून देखील कुठलीही दखल घेतली जात नाही. बांधकाम विभागाचे अधिकारी जीवितहानी झाल्यानंतर जागे होणार का? त्यामुळे येत्या आठ दिवसांत या रस्त्याची डागडुजी न झाल्यास रस्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा असलदे सरपंच तथा भाजपा तालुका सरचिटणीस पंढरी वायंगणकर यांनी दिला आहे. निपाणी -देवगड हा राज्य महामार्ग रस्ता आहे.या महामार्गावरुन दररोज शेकडो वाहनांची ये-जा करत आहेत. दुचाकीवरुन देखील मोठ्या प्रमाणात प्रवासी ये-जा करत असतात.या ठिकाणी मोठे खड्डे पडल्याने अपघात होत आहेत. असलदे आणि कोळोशी गावातील नागरीकांना याठिकाणी रस्त्यावरून येत जात असताना सातत्याने अपघात होत आहेत. अनेकदा सार्वजनिक विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून देखील दुर्लक्ष केला जात आहे.त्यामुळे येत्या आठ दिवसांत सार्वजनिक बांधकाम विभाग देवगड यांनी तातडीने खड्डे बुजवून डागडुजी करावी. अन्यथा सनदशीर मार्गाने रस्ता रोको आंदोलन छेडून त्या अधिकाऱ्यांना जाग आणली जाईल,असा इशारा पंढरी वायंगणकर यांनी दिला आहे.