मच्छिमारांचे साखळी उपोषण आंदोलन सलग सातव्या दिवशी सुरूच
मालवण दि प्रतिनिधी पारंपारिक मच्छीमारांनी मालवणात छेडलेले साखळी उपोषण आंदोलन आज सलग सातव्या दिवशी सुरू होते. या आंदोलनाच्या समर्थनार्थ आज दुसऱ्या दिवशीही मालवणातील मासेमारी व मासे विक्री बंद ठेवण्यात आली होती, मात्र जलक्रीडा एक दिवसाच्या बंद नंतर सुरू करण्यात आले होते. बंदी कालावधी असूनही समुद्रात सुरू असलेल्या एलईडी पर्ससीन तसेच परप्रांतीय हायस्पीड मासेमारी सुरू असताना त्यावर मत्स्य विभागाकडून कारवाई होत नसल्याच्या विरोधात अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष मिथुन मालंडकर यांच्या नेतृत्वाखाली पारंपारिक मच्छीमारांनी मालवण येथे सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले. आज सलग सातव्या दिवशी हे उपोषण सुरू होते. दरम्यान उद्या शुक्रवारपासून मालवणातील मासेमारी व मासेविक्री पुन्हा सुरू करण्यात येईल असे मिथुन मालंडकर यांनी सांगितले असून आंदोलन मात्र सुरूच राहणार असल्याचे सांगितले. गेले वर्षभर कोरोना महामारी व लॉकडाऊन मुळे सामान्य मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले असतानाही मच्छीमारांनी आपल्या न्याय हक्काच्या आंदोलनासाठी दोन दिवस मासेमारी व विक्री बंद ठेवली. मात्र कोरोनाचा प्रभाव अजूनही कायम असल्याने पुन्हा लॉकडाऊन झाल्यास मच्छीमारांना मोठा फटका बसू शकतो. बंद मुळे मच्छीमारांचे नुकसान होऊ नये यासाठी मासेमारी व विक्री उद्यापासून पुन्हा सुरू करण्यात येईल असे मालंडकर यांनी स्पष्ट केले. आम. नाईक यांनी घेतली मच्छीमारांची भेट उपोषणकर्त्या मच्छीमारांची आज आम. वैभव नाईक यांनी भेट घेतली. यावेळी आम. नाईक यांनी पारंपारिक मच्छीमारांच्या प्रश्नांबाबत राज्य शासनाकडून केंद्र शासनाकडे करण्यात आलेल्या पाठपुराव्याची माहिती दिली. तसेच मच्छीमारांच्या मागणीनुसार मत्स्यव्यवसाय विभागाकडून प्राप्त सुधारित पत्र उपोषणकर्त्याना आम. नाईक यांनी दिले. दरम्यान, आम. नाईक यांनी दिलेले मत्स्य विभागाचे सुधारित पत्र मच्छीमारांना मान्य नसल्याचे मिथुन मालंडकर यांनी सांगितले. दरम्यान, मत्स्य अधिकाऱ्यांकडून आपल्या प्रश्नांची योग्य उत्तरे मिळत नसल्याने आता मत्स्य आयुक्त किंवा मत्स्य विभाग सचिव यांनीच मच्छीमारांच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी असे मिथुन मालंडकर म्हणाले.
