दांडी येथे बंधारा कम रस्ता होण्यासाठी भाजपचे प्रयत्न…

विजय केनवडेकर:आम. नाईक यांनी घिसाडघाईने बंधाऱ्याचे काम सुरु केल्याचा आरोप

⚡मालवण ता.०५-: मालवण शहरातील दांडी बंधाऱ्याच्या पहिल्या टप्याच्या कामाच्या शुभारंभाचा नारळ आमदार वैभव नाईक यांनी श्रेयवादासाठी फोडला. मात्र, स्थानिक नागरिकांना दांडी किनाऱ्यावर बंधारा कम रस्ता हवा असताना घिसाडघाईने करण्यात येणारे हे बंधाऱ्याचे काम स्थानिक मच्छीमारांना त्रासदायक ठरणार आहे, अशी टीका भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर यांनी पत्रकार परिषदेत केली. तसेच या बंधाऱ्याच्या पुढील २०० मीटरच्या टप्प्यासाठी दांडी वासियांच्या मागणीप्रमाणे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सहकार्यातून पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी या बंधाऱ्यावर काँक्रिटीकरणासाठी विशेष तरतूद करून बंधारा कम रस्ता निश्चित केला आहे, यासाठी माजी खासदार निलेश राणे यांनी पाठपुरावा केला, असेही विजय केनवडेकर यांनी सांगितले.

मालवण येथील भाजप कार्यालयात पत्रकार परिषद झाली. त्यावेळी जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, पंकज सादये, नारायण धुरी, सौ. अन्वेषा आचरेकर, ललित चव्हाण आबा हडकर, कमलाकर कोचरेकर, संदीप मालंडकर, भाई मांजरेकर, दादा कोचरेकर, आदी व इतर उपस्थित होते.

यावेळी विजय केनवडेकर म्हणाले, दांडी येथील श्रीकृष्ण मंदिर ते मोरेश्वर मंदिर या बंधाऱ्याच्या कामाचा नारळ फोडताना आमदार वैभव नाईक यांनी स्थानिकांची मते विचारात न घेतल्याने बंधारा झाल्यानंतर त्याचा त्रास मच्छीमारांना होणार आहे. या बंधाऱ्याला मच्छिमारांच्या नौका किनारी नेण्यासाठी स्लोप ची व्यवस्था नसल्याने मच्छिमारांना अडचणी येणार आहेत. दांडी वासियांनी बंधारा कम रस्त्याची मागणी केली असताना केवळ दगड टाकून बंधारा करण्यात येत आहे. बंधारा कम रस्ता झाल्यास पर्यटन वाढीसाठी चालना मिळणार आहे. या बंधाऱ्यासाठी ३०० ते ५०० किलो वजनाचा दगड वापरणे गरजेचे असताना कमी वजनाचा दगड वापरला जात आहे. भुमीपूजन झाल्यापासून फक्त सात डंपर दगड टाकण्यात आलेआहेत. हे काम कोण ठेकेदार करतो हे आमच्यासाठी महत्वाचे नाही, तर होत असलेले काम दर्जेदार होण्यासाठी भाजपा लक्ष ठेवून राहणार आहे. बंधाऱ्यासाठी निश्चीत करण्यात आलेल्या वजनाचा दगड वापरण्यात न आल्यास याबाबत पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे तक्रार केली जाईल, असेही श्री. केनवडेकर यांनी स्पष्ट केले.

बंधाऱ्याच्या सध्या सुरू असलेल्या पहिल्या टप्प्यातील कामासाठी १ कोटी १० लाख रूपये मंजूर आहेत. यातून १५० मीटरचा बंधारा होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्याच्या कामासाठी १ कोटी ५० लाख रूपये मंजूर असून यातून २०० मीटरचे काम होणार आहे.
केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी चिवलाबिच, राजकोट बंधारे जनतेच्या मागणीनुसार साकारले होते. आमदार वैभव नाईक हे दांडी बंधारा मंजूर करण्यासाठी नऊ वर्षे वाट का बघत होते. पहिल्या टप्याचे काम पूर्ण झाले नसतानाही आम्ही दुसऱ्या टप्प्याला अवघ्या तीन महिन्यात मान्यता घेतली आहे. या संपूर्ण बंधाऱ्यासाठी आवश्यक असणारी सीआरझेडची परवानगी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रयत्नातून मिळाली आहे. आमदारांनी रस्ता कम बंधारा केला नसला तरी त्या बंधाऱ्यावर काँक्रीटीकरण करण्यासाठी भाजप नेते निलेश राणे प्रयत्न करणार आहेत, असेही श्री. केनवडेकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

भाजप नेते निलेश राणे हे कुडाळ मालवण मतदार संघातील विकासकामांसाठी सतत झटत आहेत. यासाठी त्यांनी जिल्हा नियोजन विभागातून उपलब्ध होणाऱ्या निधीबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून गावागावातून परिपूर्ण प्रस्ताव येण्यासाठी प्रयत्न केले आहेत. यामुळे आता मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत आहेत. त्याची कामे गावागावात सुरू आहेत. आमदार वैभव नाईक यांना श्रेय घेण्यासाठी नारळ फोडावे वाटत असतील तर त्यांनी खुशाल फोडावेत. आम्ही जनतेच्या दरबारात जावून जनतेला अभिप्रेत असलेली विकासकामे पूर्ण करून जनतेच्या विश्वास सार्थकी लावू, असेही विजय केनवडेकर म्हणाले.

You cannot copy content of this page