उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर..
सिंधुदुर्गनगरी ता ५
ग्रामपंचायतीनी शुध्द शाश्वत पाण्याचा पुरवठा करणे गरजेचे आहे. पाण्याचा दर्जा ग्रामपंचायतीनी राखल्यास ग्रामस्थ पाण्याचा वापर करुन १०० टक्के पाणीपट्टी हि भरणा होण्यास मदत होईल. असे प्रतिपादन पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकुर यांनी केले.
जिल्हा परिषद जिल्हा पाणी व स्वच्छता यांच्या माध्यमातुन जिल्हास्तरीय पाणी गुणवत्ता कार्यशाळेचे आयोजन आज शरद कृषी भवन सिंधुदुर्गनगरी येथे करण्यात आले होते. यावेळी कार्यकारी अभियंता (ग्रा.पा.पु) उदय महाजनी, मालवण गटविकास अधिकारी आप्पासाहेब गुजर, देवगड गटविकास अधिकारी वृषाली यादव, कणकवली गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, सावंतवाडी गट विकास अधिकारी वासुदेव नाईक, श्रीपाद पाताडे, अभियंता ग्रा.पा.पु आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विनायक ठाकुर म्हणाले की, शुध्द पाण्याच्या पुरवठ्यामुळे आरोग्यमान सुधारते तसेच आर्थिक स्तर हि उंचावतो. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातुन पाण्याची गुणवत्ता राखण्याकरीता नेहमीच प्रयत्न करण्यात येत असतो. या विभागाच्या माध्यमातुन प्रत्येक गावात ५ महिला पाणी गुणवत्ता तपासण्याकरीता तयार करण्यात आल्या असुन त्याना याबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे. आज जिल्ह्यातील पाणी गुणवत्ता अधिक सुधारणा करण्याकरीता जिल्हास्तरावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असुन यामध्ये गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, विस्तार अधिकारी ग्रामपंचायत व आरोग्य, उप अभियंता व कनिष्ठ अभियंता, गट संसाधन केंद्र(पाणी व स्वच्छता) कर्मचारी यांना प्रशिक्षीत करण्यात आले आहे. यानंतरच्या टप्यात तालुकास्तरावर ग्रामसेवक व आरोग्य सेवक यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. असे ही त्यांनी सागितले
