⚡मालवण ता.०५-: मालवण भरड येथील श्री शिवाजी वाचन मंदिर या वाचनालयाचा शतकोत्तर वर्धापन दिन नुकताच साजरा करण्यात आला. यावेळी वाचनालयाच्या नवीन इमारतीतील सभागृहात ‘बाल आनंद मेळावा’ घेण्यात आला. मुलांना विविध विषयांवर लघुपट दाखविण्यात आले. चंद्रशेखर कोचरेकर यांनी मुलांना बोलते करून त्यांचे अभिप्राय घेतले. मेळाव्यात २५ मुलांचा सहभाग होता.
यावेळी एम. एम. परुळेकर शाळेचे पार्श्व, प्रसन्न, नेहा, मयुरी या चार मुलांनी गीत सादर केले. दुसऱ्या सत्रात डॉ. महेश अभ्यंकर यांचे ‘स्वास्थ्य : नवा दृष्टिकोन’ या विषयावर व्याख्यान झाले. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पूजनाने झाली. वेदिका लुडबे व मधुरा मिठबावकर यांनी सरस्वती वंदना सादर केली, शतकोत्तर प्रथम वर्धापन दिनानिमित्त वैशाली पंडित यांनी स्वलिखित कविता लॅमिनेट करून वाचनालयाला भेट दिली. त्याचे वाचन सुधीर गोसावी यांनी केले. वाचनालयाचे हितचिंतक चंद्रशेखर कोचरेकर, तिरोडकर, पणशीकर, श्रीधर बादेकर यांना स्मृतिचिन्ह व गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले. वाचनालयाच्या कर्मचारी मानसी दूधवडकर, शांभवी कोळगे, संतोष कोचरेकर यांना स्मृतिचिन्ह व गुलाबपुष्प देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले. सूत्रसंचालन वैदेही जुवाटकर, तर प्रास्ताविक व आभार डॉ. सुभाष दिघे यांनी मानले. परिचय श्रीधर काळे यांनी करून दिला.
‘स्वास्थ्य एक नवा दृष्टिकोन’ या विषयावर बोलताना डॉ. अभ्यंकर म्हणाले, प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असतो. प्रत्येकाच्या वयानुसार त्याचे – आरोग्य असते. परिस्थितीचा मनावर होणारा परिणाम, अशा प्रतिकूल परिस्थितीतही आरोग्याची काळजी कशी घ्यावी, ते सांगितले. जीवनात तणाव आला, तर आपले मन चांगली गाणी ऐकून अथवा चांगली पुस्तके वाचून कमी केले पाहिजे. आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल, तर रिस्क घेतलीच पाहिजे. आपल्या आरोग्याची काळजी घ्या, असे त्यांनी आवर्जून सांगितले. कार्यक्रमाची सांगता मेधा शेवडे यांनी पसायदानाने केली. कार्यक्रमाला वाचनालयाचे सदस्य, विश्वस्त, न्यायमूर्ती जामदार व प्रतिभा जामदार, कर्मचारी उपस्थित होते.
