बांदा कृषी विभाग व कार्बोनेक्स्ट इंडिया कंपनीचे आयोजन
बांदा/प्रतिनिधी
डेगवे गावात कृषि विभाग बांदा व कार्बोनेक्स्ट कंपनी नाशिक यांचेकडून कार्बन हार्वेस्टरचे (नारळ, सुपारी, आंबा काढणी उपकरण) माऊली मंदिर डेगवे व मधुकर देसाई डेगवे यांच्या बागेत प्रात्यक्षिक करून शेतकऱ्यांना दाखविण्यात आले.
यावेळी कंपनीचे संचालक अभिजित खत्री व मंडळ कृषी अधिकारी युवराज भुईंबर यांच्यासह त्यांचे बांदा मंडळातील सर्व सहकारी कृषी अधिकारी उपस्थित होते. सदर टेलिस्कोपीक पोल हा पूर्णपणे कार्बन फायबरचा बनविलेला असून एकदम हलका व टिकाऊ आहे . २४ फुटापासून ८० फुटापर्यंतची नारळ, सुपारी, आंबा झाडांची फळे काढणी, झाडावरील नको असलेल्या व मेलेल्या फांद्याचे प्रुनिंग शिवाय उंच झाडावर पाईपद्वारे औषधे फवारणी अशी कामे या पोलद्वारे जोखीम न पत्करता सहज वापरता येऊ शकतात असे खत्री यांचेकडून सांगण्यात आले.
उपस्थित शेतक-यांनीही स्वतः पोल हाताळून बागेत प्रात्यक्षिक करून बघितले. शेतक-यांच्याही पसंतीस हे उपकरण पडले असून कमी मजूर उपलब्धता असल्यामुळे याचा प्रत्येक बागायतदारास चांगला उपयोग होवू शकतो आणि बागायतदार स्वतः देखील हा टेलिस्कोपीक पोल सहजपणे हाताळू शकतो असे शेतक-यांचे म्हणणे आहे. फक्त यांची किंमत अनुक्रमे त्यांचे माॅडेल नुसार निश्चित करण्यात आली आहे. कृषि औजारे मधून किंवा सिंधुरत्न सारख्या योजनामधून यास काही सबसिडी मिळाली तर ती सर्व शेतक-यांसाठी उपयुक्त बाब ठरेल असे उपस्थित तांबोळी येथील प्रगतशिल शेतकरी व पदाधिकारी अभिलाष देसाई, मधुकर देसाई, प्रेमानंद देसाई, सुभाष देसाई, डेगवे सरपंच राजन देसाई, डिंगणे माजी सरपंच जयेश सावंत यांनी आपल्या मनोगतातून सांगितले. कार्यक्रमाची प्रस्तावना बांदा कृषी पर्यवेक्षक प्रकाश घाडगे यांनी केली तर कार्यक्रमाचे संपुर्ण नियोजन डेगवे गावचे कृषी सहाय्यक अतुल माळी यांनी केले. कार्यक्रमासाठी बांदा मंडळचे कृषी अधिकारी अजमुद्दीन सरगुरू, शेतिनिष्ट पुरस्कार २०१९ प्राप्त शेतकरी शिवप्रसाद देसाई, कृषि मित्र डेगवे सुर्याजी देसाई, पडवे माजगावचे कृषि मित्र सचिन देसाई, ग्रामपंचायत सदस्य राजेश देसाई, डेगवे मधील काजू युनिटधारक व बागायतदार भिवसेन उर्फ पप्पू देसाई आदी उपस्थित होते.
डेगवेचे माजी उपसरपंच मधुकर देसाई यांनी उपस्थितांचे आभार मानले.
