पर्यावरणात पर्वतांना अनन्यसाधारण महत्त्व…

डॉ. संजिव लिगवत:अणसूर पाल हायस्कूल येथे आंतरराष्ट्रीय पर्वत दिन साजरा..

⚡वेंगुर्ला ता.१५-: पावसाच्या वाटणीसाठी पर्वतांचे महत्त्व असून गुरेढोरे, मेंढ्या चरण्यासाठी, वृक्ष, मौल्यवान लाकडे, उपयुक्त रसायने, औषधी द्रव्ये पर्वतावर मिळतात. विशिष्ट पर्वतावर चहा कॉफी लागवड होतेच, पर्वतावरून येणा-या जलप्रवाहावर विद्युत निर्मिती होते, रोजच्या धावपळीच्या जीवनात पर्वत हौशी पर्यटकांना अलिप्तता, शांतता देतो व पर्यावरण संतुलित ठेवण्यासाठी पर्वतांना अनन्यसाधारण महत्त्व आहे असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्ह्या गिर्यारोहण संघटनेचे उपाध्यक्ष डॉ.संजीव लिंगवत यांनी केले.

  अणसूर पाल हायस्कूल येथे आंतरराष्ट्रीय पर्वत दिन साजरा करण्यात आला. यावेळी व्यासपिठावर अर्चना फाऊंडेशनच्या अध्यक्षा अर्चना घारे-परब, जनसेवा प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ.संजीव लिंगवत, मुख्याध्यापक राजेश घाटवळ, शिक्षिका अक्षता पेडणेकर, चारूता परब, वैभव परब उपस्थित होते. यावेळी डॉ. लिगवत यांनी पर्वतांचे प्रकार, महत्त्व विषद करुन किल्ले संवर्धन व पर्यटन या विषयावर सविस्तर विवेचन केले.

  या कार्यक्रमात किल्ले संवर्धन व संरक्षण क्षेत्रात विशेष कामगिरी केल्याबद्दल यशवंत गड शिवप्रेमी संघटनेचे सागर नाणोसकर व साईश गोडकर यांचा शाल, श्रीफळ व गडकिल्ले पुस्तक देऊन सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण संघटना, जनसेवा प्रतिष्ठान व अर्चना घारे परब फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने अर्चना घारे परब व अणसूर पाल हायस्कूलचे मुख्याध्यापक राजेश घाटवळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय ठाकर यांनी तर आभार योगेश कुबल यांनी मानले.

फोटोओळी – पर्वत दिन कार्यक्रमात सागर नाणोसकर व साईश गोडकर यांचा सत्कार करण्यात आला.

You cannot copy content of this page