नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणार कारवाई
⚡कणकवली ता.१५-: उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशानुसार कणकवली शहर विद्रुपीकरण होणार नाही याची खबरदार घेऊन अनधिकृत जाहिरात घोषणाफलकांवर नियमित कारवाई करणेत येणार आहे.याबाबत कणकवली नगर पंचायतमार्फत कणकवली शहरातील सर्व नागरिकांना, पक्षप्रमुख, व्यवसायिक यांना जाहिरात घोषणा फलक, होर्डिंग पोस्टर्सच्या परवानगी बाबत अटी व शर्तीनुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सूचित करण्यात आले आहे.
जाहिरात प्रसिध्दीस परवानगी मिळण्यासाठी आवश्यक तो कर व अनामत रकमेचा भरणा आगाऊ करणे आवश्यक आहे. जाहिरातीबाबतची परवानगी ज्या कालावधी पुरती दिली असेल त्या मुदती बाहेर पूर्व परवानगीशिवाय जाहिरात फलक आढळल्यास ती जप्त करण्यात येऊन पुढील योग्य ती कारवाई केली जाईल. शासकीय, निमशासकिय सार्वजनिक इ. ठिकाणच्या जागेत संबंधीत संस्थांच्या पूर्व परवानगी शिवाय जाहिरात प्रसिध्द करता येणार नाही. तसे आढळून आल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता असे फलक जप्त केले जातील.जागा मालकीबाबत कोणताही वाद निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी अर्जदार यांचेवर राहील त्याबाबत नगरपरिषद जबाबदार राहणार नाही.जाहिरात फलक वर दिनांक व कालावधी नमुद करणे आवश्यक आहे. न.प. हद्दितील आवश्यक त्या शासकीय कार्यालयाची परवानगी घेणे बंधनकारक राहील. सदरचे फलक लावल्यानंतर वाहतुकीस अथवा रहदारीस अडथळा होता कामा नये तसे आढळून आल्यास सदरचे फलक काढण्यात येतील.
नगरपंचायत कोणत्याही वेळी फलक काढून घेण्याचे हक्क आपल्याकडे राखुन ठेवत आहे.
उच्च न्यायालय मुंबई यांचेकडील निर्देशांचे उल्लंघन होणार नाही याची अर्जदार यांनी दक्षता घ्यावी.
धार्मिक अथवा सामाजीक तेढ निर्माण करणारे जाहीरात फलक प्रकाशित करणेत येणार नाही.
जाहिरातीवर प्रिंटरचे नाव, मुदतीचा कालावधी, नगरपरिषद परवाना क्रमांक व दिनांक तसेच कणकवली नगर पंचायत मार्फत पुरविण्यात आलेला QR कोड यांची स्पष्टपणे नोंद घेणे बंधनकारक राहिल अन्यथा जाहिरात बेकायदेशीर ठरवून कारवाई केली जाईल.सदर फलक लावल्यामुळे अपघात झालेस त्यास अर्जदार जबाबदार राहतील.अटी व शर्थीचे उल्लंघन झाल्यास परवानगी रद्द समजण्यात येईल.असे कणकवली नगरपंचायतीच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.
