तोंडवळी येथील मच्छिमारांचा निश्चय;मत्स्य विभागाला कारवाई करायची असेल तर सर्वच पर्ससीन मासेमारी बंद करून दाखवावी..
⚡मालवण ता.११-: गेल्या दोन वर्षात पारंपारिक मच्छिमारीतील मासळीला योग्य दर मिळत नसून यामुळे अनेक मच्छिमारांवर कर्जबाजारी होत आहेत. म्हणूनच आम्ही तोंडवळी मधील काही पारंपारिक मच्छिमारांनी एकत्र येत पारंपारिक मच्छिमारीला विकसित करण्याच्या दृष्टीने आधुनिक रापण म्हणजेच मिनी पर्ससीन मासेमारी सुरू केली आहे. आम्ही सुरु केलेल्या मिनी पर्ससीन मासेमारीला परवानगी द्यावी अशी मागणी स्थानिक मत्स्य विभागासह मत्स्य विकास मंत्र्यांकडे केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही आधुनिक मासेमारीकडे वळण्याचे आवाहन केले असताना पारंपारिक मच्छिमारांनी आता मिनी पर्ससीन मध्ये रूपांतरित व्हावे, असा निश्चय तोंडवळी येथील मच्छिमारांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना केला.
दरम्यान, मत्स्य विभाग आमच्यावर सूडबुद्धीने कारवाई करत असून एलइडी व हायस्पीड ट्रॉलर मासेमारीला अभय दिले जात आहे. मत्स्य विभागाला कारवाई करायची असेल तर सर्वच पर्ससीन मासेमारी बंद करून दाखवावी, त्यावेळी आम्हीही मिनी पर्ससीन बंद करून पुन्हा पारंपारिक मच्छिमारी सुरु करू, अशी भूमिकाही या मच्छिमारांनी मांडली.
तोंडवळी येथील मिनी पर्ससीन करणाऱ्या मच्छिमारांनी मालवण सागरी मार्ग येथील स्वरा हॉटेल मध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी हनुमंत देऊलकर, वासुदेव पाटील, हर्षल केळूसकर, महेश मालंडकर, गंगाराम पाटील, झकास खवणेकर, विजयी रेवंडकर, हेमंत खडपकर, देवराज केळूसकर, रामचंद्र मायबा, विजय खवणेकर, रामचंद्र तांडेल, कीर्तिराज चोडणेकर, हरिश्चंद्र मालंडकर, आनंद झाड, राहुल पाटील, तुषार तोरसकर, हर्षद पाटील, आशिष शेलटकर, विठ्ठल सादये आदी उपस्थित होते.
यावेळी मच्छिमार म्हणाले, पारंपारिक गिलनेट मच्छिमारी मधून मिळालेल्या मासेमारीला योग्य भाव मिळत नसल्याने आज अनेक मच्छिमारांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. मासे नष्ट होतील या भीतीने आम्हीही आज पर्यंत पारंपारिक मच्छिमारी केली. मात्र गेल्या दोन वर्षात आमच्या व्यवसायावर विपरीत परिणाम झाला आहे. एलइडी व परराज्यातील हायस्पीड ट्रॉलरद्वारे येथील समुद्रात मोठ्या प्रमाणात मासेमारी होत आहे, त्यामुळे येथील पारंपारिक मच्छिमारी धोक्यात आली आहे, असे असताना आम्हीही मागे का राहावे या विचाराने आम्ही मिनी पर्ससीन मासेमारी सुरु केली असून यामध्ये पारंपारिक गिलनेट मासेमारी पेक्षा तिप्पट दर मिळत आहे. स्थानिक मच्छिमारांनी एकत्र येऊन ताकद दाखवली तरच एलइडी व हायस्पीड ट्रॉलर मच्छिमारीला टक्कर देता येईल. म्हणूनच आम्ही काही मच्छिमारांनी एकत्र येत भागभांडवल एकत्र करून आधुनिक मासेमारीकडे वळलो आहोत, असे मच्छिमारांनी सांगितले.
प्रशासन व मत्स्य विभागाकडून सूडबुद्धीची भूमिका घेतली जात असून आमच्यावर कारवाई केली जात आहे. समुद्रात निर्बंध असलेली एलइडी व परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर मच्छिमारीवर कारवाई होत नाही. प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई करावी. अन्यथा कारवाई करायची असल्यास पूर्ण पर्ससीन बंद करावी, त्यावेळी आम्हीही मिनी पर्ससीन बंद करून पुन्हा पारंपारिक मच्छिमारी करू असेही मच्छिमारांनी सांगितले. एलइडी चा वापर करून म्हाकूल माशांची लयलूट करण्याचा प्रयत्न काही गिलनेट धारक मच्छिमारांकडून होत आहे, त्यावर मत्स्य विभागाने कोणती कारवाई केली ? तसेच मासेमारी बंदी कालावधीमध्येच मोठ्या प्रमाणावर मासेमारी करून मत्स्य बीज नष्ट करत आहेत, त्यामुळे मत्स्य प्रजनन घटून मासळी मिळत नसल्याने लहान मच्छिमारांवर उपासमारीची वेळ येत आहे, बंदी कालावधीमधील मासेमारीवर कारवाईची तरतूद असताना मत्स्य विभाग कारवाई करत नाही. मत्स्य विभागाने ही कारवाई करावी, कारण खाडीत पारंपारिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांना त्याचा फायदा होणार आहे, असेही मच्छिमार म्हणाले.
मिनी पर्ससीन मासेमारीला परवानगी मिळावी अशी मागणी तोंडवळीच्या मच्छिमारांनी मालवण येथील सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त यांच्याकडे केली असून त्याचे निवेदन मत्स्य अधिकारी तेजस्विता करंगुटकर यांना सादर केले आहे. तसेच वाघेश्वर मिनी पर्ससीन मच्छिमार यूनियन तोंडवळी यांनी राज्याचे मत्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाही निवेदन दिले आहे. आम्ही पिढ्यानं पिढ्या पारंपरिक मासेमारी करतो. मात्र निर्यात कंपनी पारंपरिक मच्छिमार गिलनेट यांचा मासे माल घेत नाहीत. कारण टिकाऊपणा दर्जा कमी असतो. या सर्वांचा परिणाम या व्यावसायावर अवलंबुन आम्हा मच्छिमारांवर होत आहे. त्यामुळे आधुनिक प्रकारची पर्ससीन नेट मासेमारी आम्ही करणार आहोत. त्यासाठी मिनी पार्ससीन मासेमारी करता नौकेला परवाना मिळावा, अशी मागणी करण्यात आल्याचे मच्छिमारांनी सांगितले.
