१० वर्षाखालील गटात ओम मदन शिरोडकर द्वितीय तर ज्येष्ठ नागरिकांच्या गटात मेघश्याम राणे प्रथम…
⚡सावंतवाडी ता.११ सहदेव राऊळ-: सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली यांच्यावतीने आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत तालुक्यातून मळगाव गावाने बाजी मारली आहे. १० वर्षाखालील गटात मळगाव येथील शारदा विद्यालयाच्या इयत्ता चौथीत शिकत असलेला ओम मदन शिरोडकर याने द्वितीय क्रमांक पटकाविला तर ज्येष्ठ नागरिकांच्या मोठ्या गटात मळगाव येथीलच भारतीय सैन्य दलातील निवृत्त सैनिक मेघश्याम राणे यांनी प्रथम क्रमांक मिळविला. दोन्ही खेळाडूंचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली यांच्यावतीने घेण्यात आलेल्या या मॅरेथॉन स्पर्धेस स्पर्धकांचा उदंड प्रतिसाद लाभला. या स्पर्धेला सांगली, सातारा, कोल्हापूर, नाशिक, मुंबई, रत्नागिरी, दापोली, गडहिंग्लज, चंदगड अशा विविध राज्य भरातून चारशेहून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. ही स्पर्धा १०,१४,१७ वयोगटातील मुले, मुली, खुला वयोगट मुले, मुली व जेष्ठ नागरिक अशा विविध वयोगटात घेण्यात आली. १० वर्षाखालील गटात ओम मदन शिरोडकर याने द्वितीय क्रमांक प्राप्त केला, तर ज्येष्ठ नागरिकांच्या मोठ्या गटात मेघश्याम राणे यांनी प्रथम क्रमांक मिळवित मळगाव गावचे नाव उज्ज्वल केले. विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. ओम शिरोडकर याला धावणे, खेळणे, सायकलिंग आदी क्रीडा प्रकारांची खूप आवड आहे. या गोष्टींचा त्याचा रोज सराव असतो. सातत्य असल्यामुळेच त्याला हे यश प्राप्त झाले आहे, असे त्याचे वडील मदन शिरोडकर यांनी ग्लोबल महाराष्ट्र न्युज चॅनेलशी बोलताना सांगितले. या यशाबद्दल ओम शिरोडकर याचे शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यावतीने अभिनंदन करून त्याला भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यशस्वी दोन्ही खेळाडूंचे सर्वत्र कौतुक होत आहे
