कुडाळ पोलिसांनी रशियन नागरिकांची हरवलेली बॅग मिळवून दिली परत…

⚡कुडाळ ता.११-: एक रशियन नागरिक रविवार, १० डिसेंबर रोजी दिल्लीहून गोवा येथे मंगला एक्सप्रेसने जात असताना दुपारी ३ वा. दरम्यान त्याचा मोबाईल कुडाळ रेल्वेस्टेशनच्या पुढे हातातून पडला. त्याने रेल्वे झाराप स्टेशनच्या पुढे आल्यावर रेल्वेतील इमर्जन्सी चैन ओढून रेल्वे थांबवली. त्यानंतर रशियन नागरिक रेल्वेतून आपली बॅग घेऊन मोबाईल शोधण्याकरिता रेल्वेतून खाली उतरला व रेल्वे ट्रॅकवरून कुडाळच्या दिशेने मोबाईल शोधण्याकरिता चालत येऊ लागला.

त्यावेळी त्याच्याकडे असलेल्या प्रवासी बॅगचे त्याला ओझे झाल्यामुळे त्यांनी ती बॅग रेल्वे ट्रॅकच्या बाजूला ठेवून तसाच तो पुढे चालत येऊन रेल्वे ट्रॅकवरून तो पिंगुळी या ठिकाणी पोहोचला. त्यावेळेस त्याचा हरवलेला मोबाईल मिळाला नसल्यामुळे तो रात्री १० च्या सुमारास कुडाळ पोलीस ठाणे येथे मदत मागण्याकरिता आला. त्याच्या प्रवासी बॅगमध्ये त्याचा पासपोर्ट, विजा व इतर महत्त्वाची कागदपत्रे असल्यामुळे तो भयभीत झालेला होता. त्याने आपली बॅग कोणत्या ठिकाणी ठेवली होती ती त्यास आठवत नसल्यामुळे रात्रीच्यावेळी बॅग शोधणे मोठे जिकरीचे काम होते. सदर वेळी वरिष्ठ गस्तीकरिता असलेल्या कुडाळ पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला यांनी रशियन नागरिक याला त्याची बॅग शोधण्याकरिता कुडाळ पोलीस ठाणे येथील पोलीस हवालदार अनिल पाटील आणि पोलीस हवालदार अमोल बंडगर यांना दुपारी ज्या ठिकाणी मंगला एक्सप्रेस थांबली होती त्या ठिकाणापासून कुडाळच्या दिशेने येणाऱ्या रेल्वे ट्रॅकवर बॅग शोधण्यासाठी रशियन नागरिकांसोबत पाठवले. सदर पोलीस अंमलदार यांनी रात्रीच्या वेळी रेल्वे ट्रॅकच्या दोन्ही बाजूनी शोध घेऊन रशियन नागरिकास त्याची हरवलेली प्रवासी बॅग मिळवून दिली. ज्यावेळेस त्याची बॅग मिळाली त्यावेळेस त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यावेळी त्या परदेशी युवकाने कुडाळ पोलीस ठाणे यांचे मनापासून आभार मानले.

You cannot copy content of this page