अन्वर खान:प्रशालेच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचे शानदार उद्घाटन..
⚡बांदा ता.१०-: दिव्य ज्योती प्रशालेने बांदा पंचक्रोशीला अनेक गुणवान विद्यार्थी घडवून दिलेले आहेत. त्यांच्यातील गुणवत्तेसोबतच त्यांच्या संस्कारांची, शिस्तीची झलक विद्यार्थी समाजात वावरताना दिसून येते. मिशनरी शाळा या नेहमीच शिस्तीसाठी प्रसिद्ध आहेत. शाळेतील शिस्त ,विद्यार्थ्यांची शारीरीक क्षमता ही वाखणण्याजोगी आहे .एक सुजाण नागरिक व नेतृत्व घडवण्याचे काम खेळ करतात. खेळातून शिस्तबद्धता ,सांघिकपणा, नेतृत्व ,संघासाठी झोकून खेळण्याची वृत्ती या गुणांचा विकास होतो .त्यामुळे मुलांनी मैदानी खेळ आवर्जून खेळले पाहिजेत .आजकाल मुले मोबाईल गेम ,इंटरनेटच्या विळख्यात सापडली आहेत. त्यामुळे मैदानी खेळांकडे दुर्लक्ष होत आहे. विद्यार्थ्याना खेळांबाबत आवड निर्माण करणे आणि खेळायची संधी देणे गरजेचे आहे. शालेय अभ्यासक्रमासोबतच विद्यार्थ्यांच्या अंतरीक गुणांना वाव मिळावा यासाठी दिव्यज्योती प्रशालेत विविध स्पर्धांचे आयोजन करून अष्टपैल विद्यार्थी, गुणवान विद्यार्थी घडवले जातात. याबाबत या प्रशालेचे कौतुक करावे तितके थोडेच.’असे विचार यावेळी अन्वर खान सर यांनी बोलताना व्यक्त केले. प्रशालेच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते .
दिनांक आठ व नऊ डिसेंबर रोजी दिव्य ज्योती प्रशालेचा वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात पार
पडला. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे ज्येष्ठ नागरिक विकास मंच, बांदाचे अध्यक्ष तथा मुख्यालय आयुक्त स्काऊट गाईड मार्गदर्शक, सिंधुदुर्गचे माजी पदाधिकारी माननीय श्री अन्वर खान सर ,दिव्य ज्योती प्रशालेचे मुख्याध्यापक फादर बॅनेट, उपमुख्याध्यापक फादर रॉबिन आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रार्थना नृत्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी उत्कृष्टरित्या गटानुसार संचलन सादर केले. मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ फोडून व क्रीडा मशाल पेटवून क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील विद्यार्थ्यांनी अनेक सांघिक व वैयक्तिक खेळांत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि आपले कौशल्य दाखवले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेच्या विद्यार्थिनी कु.श्रेया दळवी व कु. स्वरा सातार्डेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन कु. क्लिंटन फर्नांडिस याने केले. दिव्यज्योती प्रशालेचा दोन दिवसीय क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला.
