‘आरोस विद्या विकास’मध्ये विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद…

एक दिवस आड करून नववी, दहावी वर्ग सुरू

बांदा दि.२५-:* कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले आठ ते साडेआठ महिने बंद असलेल्या आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूलची पालकांच्या सहमतीने अखेर घंटा वाजली. नववी व दहावी वर्ग एक दिवस आड करून सर्वतोपरी काळजी घेऊन सुरू करण्यास पालकांनी मान्यता दिल्याचे प्रभारी मुख्याध्यापक विद्याधर देसाई यांनी सांगितले. तसेच दोन दिवसांत विद्यार्थ्यांचा बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाल्याचेही श्री.देसाई म्हणाले. शासनाच्या परिपत्रकानुसार शाळा सुरू करण्यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी शाळेत पालक, शालेय समिती सदस्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची दोन टप्प्यात वर्गानुसार बैठक पार पडली. यावेळी शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष प्रमोद मुळीक, प्रभारी मुख्याध्यापक विद्याधर देसाई तसेच सुमारे 60 पालकांची उपस्थिती होती. सर्व काळजी घेऊन शाळा सुरू करण्यास पालकांनी सहमती दर्शवली. आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूलमध्ये सोमवारी पहिल्या दिवशी नववीतील 38 पैकी 22 मुले तर मंगळवारी दुसऱ्या दिवशी दहावीतील 35 पैकी 26 मुले हजर होती. परिस्थितीचा आढावा घेत आठ दिवसांसाठी प्रायोगीकस्तरावर अशाप्रकारे वर्ग घेतले जाणार असून आवश्यक काळजी घेतली जाणार आहे. ज्या पालकांनी संमतीपत्रे दिली त्याच मुलांना शाळेत प्रवेश देण्यात आल्याचे विद्याधर देसाई यांनी सांगितले. दरम्यान, शाळा सुरू करताना अनेक आव्हानात्मक परिस्थितीचा सामना आम्हाला करावा लागणार आहे. तरी देखील विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान पाहता प्रशासनाच्या नियमांचे पालन करत मुलांना शिक्षण दिले जाणार आहे. तसेच गरज भासल्यास सॅनिटायझर व इतर आरोग्यासंदर्भात सुविधा पुरविणार असल्याचे मळेवाड जि.प.सदस्य राजन उर्फ राजू मुळीक यांनी सांगितले.

You cannot copy content of this page