खंडित नेटवर्क ने आले मेटाकुटीस
मालवण-:* कट्टा पंचक्रोशीतील अनेक भागात बीएसएनएल नेटवर्क वारंवार ठप्प होत असल्याने ग्राहकांमधून याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. वेळोवेळी याबाबत तक्रार दाखल केली असतानाही कोणतीही दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत ही समस्या तात्काळ न सोडविल्यास बीएसएनएल विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्राहकांकडून देण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कट्टा पंचक्रोशीत व या मोबाईल नेटवर्क टॉवर कार्यक्षेत्रात बीएसएनएलचे लाखो ग्राहक आहेत. परंतु सध्या नेटवर्क गायब होत असलेल्या या समस्येमुळे अनेक ग्राहक बीएसएनएलपासून दुरावले जात आहेत. प्रत्येक महिन्याला बीएसएनएलचे रिचार्ज करूनही ग्राहकांना योग्य सेवा बीएसएनएलकडून दिली जात नाही. नेटवर्क सेवा वारंवार खंडित होते. याबाबत तक्रार केली असता त्यावर गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. समस्या सोडविली जात नाही. त्यामुळे कट्टा पंचक्रोशीतील व्यापारी, सर्वपक्षीय कार्यकर्ते, रिक्षाचालक, डॉक्टर व सर्व बीएसएनएल ग्राहक यांनी एकत्र येऊन बीएसएनएल विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
