⚡कुडाळ ता ०५-: शासनाचा विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रम मंगळवारी कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे गावामध्ये संपन्न झाला. या यात्रेचे स्वागत सरपंच वेदिका दळवी यांच्या हस्ते करण्यात आले. तर उपसरपंच प्रदीप गावडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा स्तरावरील असून शासनाच्या विविध योजनांची माहिती स्क्रीनच्या माध्यमातून लोकांना समजेल अशा पद्धतीने दिली गेली.
विकसित भारत संकल्पना १५ नोव्हेंबरपासून राबविण्यात येत आहे. तळागाळापर्यंत सरकारच्या योजना पोहचल्या पाहिजेत. त्याचा लाभ प्रत्येकाने घेतला पाहिजे. शेतकरी वर्गाच्या समस्या, शेतकरी योजना, समाज कल्याण योजना, आरोग्य योजना यांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहचल्या पाहिजेत, असे आरोग्य विस्तार अधिकारी धनवे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी वैद्यकीय अधिकारी
डॉ. कविता पराडकर यांनी आरोग्य विभागाच्या अनेक योजना या गावात पोहचविण्यासाठी प्रयत्न सुरू असून आयुष्मान भव, आभा कार्ड योजना यांची माहिती दिली. ज्यांना आयुष्मान भव, आभा कार्ड काढायची असतील त्यांना आरोग्य विभाग प्रतिनिधी सहकार्य करतील, असे आश्वासन दिले. मुख्य म्हणजे महिलांचे आरोग्य विषयक जनजागृती होणे आवश्यक आहे. त्यासाठी केंद्र सरकारने महिला वर्गासाठी अनेक आरोग्यदायी योजना आणल्या आहेत. त्यांची माहिती महिलांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे, असे स्पष्ट केले.
तसेच कृषी विज्ञान केंद्र किर्लोसचे प्रतिनिधी सुनील जाधव यांनी सुद्धा कृषी विभागाकडून राबविणाऱ्या योजना यांची माहिती दिली. यावेळी पणदूर आरोग्य केंद्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. कविता पराडकर, कृषी विज्ञान प्रतिनिधी सुनील जाधव, ग्रामपंचायत सरपंच वेदिका दळवी, उपसरपंच प्रदीप गावडे आणि ग्रामपंचायत वेताळ बांबर्डे सर्व सदस्य आणि कर्मचारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी उज्ज्वला योजना, घरकुल योजना लाभार्थी यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
