⚡मालवण ता.०५-: मालवण येथील अ. शि. दे. टोपीवाला हायस्कूल येथे स्व. वसंतराव अभ्यंकर विज्ञान जत्रा संपन्न झाली. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या विज्ञान जत्रेत प्रशालेचे कलाशिक्षक बी. जी. सामंत यांच्या संकल्पनेतून साकार झालेली चंद्रभूमी व चंद्रयान प्रतिकृती, तसेच प्रशालेतील ४०० विद्यार्थ्यांनी बनविलेल्या विज्ञान पताका लक्षवेधी ठरल्या.
टोपीवाला हायस्कुलचे माजी विद्यार्थी महेश अभ्यंकर यांच्या कल्पनेतून आणि आर्थिक पाठबळातून त्यांच्या वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ गेली चार वर्षे टोपीवाला हायस्कूलमध्ये या जत्रेचे आयोजन केले जाते. या विज्ञान जत्रेचे उद्घाटन टोपीवाला हायस्कूलच्या नूतनीकरण केलेल्या सेंट्रल हॉलमध्ये उद्घाटन संस्था सचिव विजय कामत यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने झाले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मालवण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष दिगंबर सामंत तसेच संस्थेचे विश्वस्त अविनाश आजगावकर आणि हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक संजय जोशी, निवृत्त पर्यवेक्षक सुभाष प्रभूखानोलकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
पर्यवेक्षक लक्ष्मण वळंजू यांच्या वडिलांनी रचलेले आणि वळंजू यांनी संगीतबद्ध केलेले विज्ञान गीत ईशस्तवन म्हणून विद्यार्थ्यांनी सादर केले. प्रास्ताविक लक्ष्मण वळंजू यांनी केले मुख्याध्यापक खानोलकर यांनी विचार मांडले. सुभाष प्रभूखानोलकर यांनी विज्ञान जत्रेची संकल्पना मांडली. सूत्रसंचालन शिक्षिका मयुरी भिसे यांनी केले. आभार दर्शना सामंत यांनी मानले.
यावर्षीच्या विज्ञान जत्रेत वक्तृत्व स्पर्धेत ५१, निबंध स्पर्धेत १२२, प्रश्नमंजुषा स्पर्धेत ११४ आणि विज्ञान प्रतिकृती स्पर्धेत ११८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेचे परीक्षण करून प्रथम तीन क्रमांक प्रत्येक गटातून काढण्यात आले. पारितोषिक वितरण जानेवारीत शालेय बक्षीस वितरण कार्यक्रमात करण्यात येणार आहे.
