*देवबाग सुपुत्र आणि मुंबई इंडियन्स संघाचे सदस्य दर्शन बांदेकर यांच्या संकल्पनेतून स्पर्धेचे आयोजन
मालवण (प्रतिनिधी) देवबागचा सुपुत्र आणि मुंबई इंडियन्सचा सदस्य असणाऱ्या गोलंदाज दर्शन बांदेकर याच्या संकल्पनेतून देवबाग गाव आयोजित सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित देवबाग चषक २०२१ भव्य क्रिकेट स्पर्धा दि. २२ ते २६ मार्च या कालावधीत मालवणच्या बोर्डिंग मैदानावर संपन्न होणार आहे, या स्पर्धेतील विजेत्या संघांना रोख पारितोषिके व आकर्षक चषक देण्यात येणार असून या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण युट्युबद्वारे करण्यात येणार आहे, अशी माहिती स्पर्धा कमिटीतर्फे पत्रकार परिषदेत देण्यात आली. देवबाग चषक २०२१ क्रिकेट स्पर्धा कमिटीतर्फे देवबाग येथील ओशन ब्लिस हॉटेल मध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यावेळी कमिटी अध्यक्ष स्वप्नील साळगावकर, सचिव रामचंद्र चोपडेकर, खजिनदार रुपेश खोबरेकर, उल्हास तांडेल, बाबू बिरमोळे, रमेश कद्रेकर, नादार तुळसकर, मनोज खोबरेकर, बाबली चोपडेकर, सहदेव साळगावकर व इतर उपस्थित होते. यावेळी रुपेश खोबरेकर यांनी स्पर्धे विषयी माहिती दिली. देवबाग चषक स्पर्धेची संकल्पना गावचा सुपुत्र दर्शन बांदेकर याने मांडली असून त्यास गावाने साथ दिली आहे. ही क्रिकेट स्पर्धा जिल्हा मर्यादित असून यात १६ संघ सहभागी होणार आहेत. प्रत्येक संघातून १५ खेळाडू याप्रमाणे २४० खेळाडू या स्पर्धेत सहभागी होतील. सहा षटकांचे सामने होणार आहेत. सहा कमेऱ्यांद्वारे स्पर्धेचे युट्युब वरून थेट प्रक्षेपण होणार असून थर्ड अंपायरची सुविधाही उपलब्ध असणार आहे. या स्पर्धेसाठी भारताचे माजी क्रिकेटपटू पांडुरंग साळगावकर यांच्यासह अन्य मान्यवरांना आमंत्रित करण्यात येणार आहे. २२ रोजी सकाळी १० वाजता या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. कोरोना विषयक शासनाचे नियम पळून ही स्पर्धा होणार आहे, असे यावेळी रुपेश खोबरेकर यांनी सांगितले. या स्पर्धेतील विजेत्या संघास रु. १ लाख २१ व चषक, उपविजेत्यास रु. ७५ हजार २१ व चषक, तृतीय व चतुर्थ क्रमांकास २१ हजार २१ रु. व चषक तसेच मालिकावीर- हिरो सायकल व चषक, उत्कृष्ट फलंदाज व गोलंदाज- हिरो सायकल व चषक तसेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, यष्टीरक्षक व अंतिम सामनावीर यांना रोख बक्षीस व चषक देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी खेळाडूंचा लिलाव गॉडस गार्डन, देवबाग येथे होणार असून इच्छुक खेळाडूंनी आपली नावे दि. १५ मार्च पर्यंत मितेश बांदेकर ९३२५५२१७६३, राम चोपडेकर ९९२००२७५८७, रुपेश खोबरेकर ९४२३८७८७६० यांच्याकडे नोंदवावीत, असे आवाहन यावेळी स्पर्धा आयोजकांतर्फे करण्यात आले.
