⚡सावंतवाडी ता.२८-: सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली गावची ग्रामदेवता अर्थात भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री देवी माऊलीचा आगळा वेगळा असा “लोटांगण” जत्रोत्सव मंगळवार २८ नोव्हेंबर रोजी साजरा होत आहे. ” दीन जनांची माऊली” भक्तांची साऊली अर्थात “सोनुर्लीची बाये” म्हणून देवीची ओळख सर्वदूर आहे. याच माऊलीच्या जत्रोत्सवाच्या निमित्ताने ग्लोबल महाराष्ट्र चॅनलच्या माध्यमातून घेण्यात आलेला धावता आढावा….
कोकणचे प्रतिपंढरपूर म्हणजे सोनुर्ली श्री देवी माऊलीचा वार्षिक उत्सव अशी ओळख असलेल्या श्री देवी माऊलीची ख्याती राज्यातच नव्हे तर नजिकच्या कर्नाटक व गोवा राज्यातही पसरली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकुण जत्रोत्सवांपैकी मोठी जत्रा म्हणून सोनुर्ली श्री देवी माऊलीची जत्रा प्रसिद्ध आहे. देवीचे महात्म्य सातासमुद्रापार पोहोचले असून नवसाला पावणारी व भक्तांच्या हाकेला धावणारी देवी म्हणून माऊली चरणी दरवर्षी हजारो भक्तगण नतमस्तक होतात. भक्तगण आपले अडी-अडचणी घालवण्यासाठी देवीकडे लोंटागणाचा नवस बोलतात व जत्रोत्सवादिवशी रात्री तो फेडला जातो. नवसकरी महिला उभ्याने मंदिराभोवती प्रदक्षिणा घालून हा नवस फेडतात तर पुरुष जमिनीवर लोटांगण घालून नवस फेडतात. लोटांगण कार्यक्रम पाहण्यासाठी भक्तगण एकच गर्दी करतात. देवीचा महिमा लक्षात घेता लोटांगणाच्या संख्येमध्ये दरवर्षी वाढच पाहायला मिळते. रात्री अकरा वाजता सुरू होणारा हा सोहळा उशिरापर्यंत सुरू असतो. यावेळी
देवीच्या मंदिराचा झगमगाट आणि लोटांगणाचा उत्सव तसेच देवीचे सुखमय दर्शन डोळ्यात साठवून घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळते. दरवर्षी चार ते पाच हजार भाविक लोटांगण घालतात. सोनुर्ली आणि मळगाव अशा दोन गावाचा असलेला हा उत्सव दोन दिवस चालतो जत्रेच्या आदल्या रात्री पालखी सोहळ्यानंतर जत्रोत्सवाला खऱ्या अर्थाने सुरवात होते. त्यानंतर पहाटे देवीची विधीवत पुजा करुन दर्शन भक्तांसाठी खुले केले जाते.
जत्रोत्सवादिवशी सायंकाळी ४ वाजता मळगाव येथील कुळघरातून तरंगकाठी व मायापूर्वचारी देवाची पालखी ढोलताशांच्या गजरात वाजतगाजत निघते. मळगाव येथील मानकऱ्यांसहीत भाविक भक्तगण या पालखीसोबत येतात. सोनुर्ली- मळगावच्या सीमेवर बादा येथे सोनुर्लीचे मानकरी निशाणकाठीसह या पालखीच्या स्वागतासाठी परंपरेप्रमाणे येतात. दोन्ही गावचे मानकरी मिळून देवीला नारळ ठेवतात. यानंतर ही पालखी वाजतगाजत सर्व मानकऱ्यांसहीत सोनुर्लीच्या चव्हाट्यावर नेली जाते. याठिकाणी पालखीत माऊलीची उत्सवमुर्ती ठेवण्यात येते व मोठ्या लवाजम्यासहीत वाजतगाजत फटाक्यांच्या आतषबाजीत ही मूर्ती पालखीसह मंदिरात आणली जाते. त्यानंतर मुख्य जत्रोत्सव सुरु होतो.
जत्रोत्सवाच्या दिवसभर केळी ठेवणे, नवस बोलणे-फेडणे, ओठी भरणे आदी कार्यक्रम पार पडतात. रात्री अकराच्या पुढे लोटांगणाचा मुख्य कार्यक्रम पार पडतो. या काळात देवीचे दर्शन भक्तांसाठी बंद असते. पूर्ण लोटांगणाचा कार्यक्रम पार पडल्यानंतरच दर्शन खुले केले जाते. लोटांगणावेळी देवीचे अवसार भक्तांना दर्शन देतात. जत्रेच्या दुसरा दिवस हा गावातील लोकांचा असतो. गावातील लोक दुसऱ्या दिवशी मनोभावे देवीचे दर्शन घेतात. याच वेळी तुळाभाराचा कार्यक्रम पार पडतो देवीकडे आपल्या अडी अडचणी निवारण्यासाठी स्वतःच्या वजनाएवढे धान्य तसेच नारळ, गुळ देऊन नवस फेड केला जातो. दरवर्षी अशा प्रकारच्या नवसामध्ये वाढ पाहायला मिळते. एकूणच या कार्यक्रमानंतर जत्रोत्सव योग्यरित्या पार पडल्याचा कौल देवीच्या अवसाराकडे घेतला जातो. आणि ज्यांना पिशाच्च बाधा झाली अशा लोकांची बाधा माऊलीच्या अवसाराकडून दूर करुन जत्रोत्सवाची सांगता होते.
