वाहतूक कोंडीवर नगरपंचायतीचा कडक बडगा..
⚡कणकवली ता.१०-: शहरातील वाढती वाहतूक कोंडी, पदपथांवरील अतिक्रमणे आणि अनधिकृत पार्किंगमुळे नागरिक त्रस्त झाले असून, या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी कणकवली नगरपंचायतीने आता कडक पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या आठ दिवसांत शहरात व्यापक अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात येणार असल्याची घोषणा नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केली.
शहरातील अप्पासाहेब पटवर्धन चौक, बाजारपेठ, डीपी रोड आणि कॉलेज रोड या प्रमुख भागांवर मोहिमेचा विशेष भर राहणार आहे. शिस्तीशिवाय शहराचा विकास शक्य नाही, असे स्पष्ट करत नगराध्यक्ष पारकर यांनी पदपथांवर व्यवसाय करणारे विक्रेते तसेच अनधिकृत पार्किंग करणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाईसह गुन्हे दाखल करण्याचे संकेत दिले.
शहरात लवकरच सिग्नल यंत्रणा
वाहतुकीची समस्या नियंत्रणात आणण्यासाठी शहरात लवकरच सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार असल्याचेही पारकर यांनी सांगितले. पोलिस प्रशासनाच्या मदतीने खासगी बस आणि दुकानांसमोर अस्ताव्यस्त उभी राहणारी वाहने हटवण्याची मोहीम राबवली जाणार आहे.
नवीन भाजी मार्केट लवकरच सुरू
डीपी रोडवरील नवीन भाजी मार्केट लवकरच सुरू करण्यात येणार असून, जुन्या भाजी मार्केटच्या जागेवर आधुनिक व्यापारी संकुल उभारण्याची योजना नगरपंचायतीने आखली आहे.
गुरुवारी भरणार ‘गावठी बाजार’
ग्रामीण भागातील विक्रेत्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी दर गुरुवारी बॅडमिंटन स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स परिसरात ‘गावठी आठवडा बाजार’ भरवला जाणार आहे.
उड्डाणपुलाखाली सुशोभीकरण
शहरातील उड्डाणपुलाखालील सुमारे १८०० मीटर परिसराचे सुशोभीकरण करून आकर्षक पट्टा विकसित करण्याची योजना देखील नगरपंचायतीने जाहीर केली आहे.
