Headlines

मतदारसंघातील वीज वितरणचा प्रश्न येता दोन दिवसात मार्गी लावा…

आमदार केसरकरांच अधिकाऱ्यांना निर्देश:अनुपस्थित अधिकाऱ्यांना तातडीने बैठकीला बोलावले..

सावंतवाडी, ता. ७ : सावंतवाडी, वेंगुर्ले आणि दोडामार्ग तालुक्यांत गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या वीजपुरवठ्याच्या समस्येच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी आयोजित केलेल्या आपत्ती व्यवस्थापन बैठकीत महावितरणच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. बैठकीच्या प्रारंभी अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख आणि कार्यकारी अभियंता अरविंद वनमोरे अनुपस्थित असल्याने आमदार केसरकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांना तातडीने बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश दिले.
बैठकीत दोडामार्गसह विविध भागांत १४ दिवसांहून अधिक काळ वीजपुरवठा खंडित असल्याबद्दल केसरकर यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. “लोक अनेक दिवस अंधारात आहेत, मग अधिकारी बैठकीला अनुपस्थित का?” असा सवाल करत त्यांनी वीजपुरवठा तातडीने पूर्ववत करण्याचे निर्देश दिले.
यावर अधिकाऱ्यांनी दोडामार्ग येथील ३३ केव्ही वीजवाहिनी सुरू झाल्याची माहिती दिली. तसेच आंबोली, सह्याद्री पट्टा, मळगाव, तळवडे, निरवडे, वेंगुर्ले, रेडी आदी भागांतील वीजपुरवठा आज व उद्यापर्यंत टप्प्याटप्प्याने सुरळीत होईल, असे आश्वासन दिले. आवश्यक यंत्रणा व दुरुस्ती पथके कार्यरत असल्याचेही त्यांनी सांगितले.
बैठकीत लोकप्रतिनिधींनी महावितरणमधील मनुष्यबळाची कमतरता, वाहनांची अपुरी उपलब्धता, देखभाल-दुरुस्तीतील विलंब आणि वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. स्थानिक कर्मचाऱ्यांवर वाढत्या कामाचा ताण असूनही वरिष्ठ स्तरावर योग्य नियोजन नसल्याची टीकाही करण्यात आली.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निकृष्ट रस्त्यांबाबत नाराजी व्यक्त केली. तसेच वनविभागाने वेळेत झाडांच्या फांद्या न तोडल्यामुळे वीजपुरवठा खंडित होत असल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. विविध विभागांनी परस्पर समन्वयाने काम करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
दरम्यान, सातार्डे येथील फुलावरील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था असल्याचा मुद्दा सदस्य सुधा कवठणकर यांनी उपस्थित केला. वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याची खंत व्यक्त करत त्यांनी, “या रस्त्यावरून शाळकरी विद्यार्थ्यांना दररोज जावे लागते. चिखल आणि खड्ड्यांमुळे त्यांच्या शाळेच्या गणवेशाची नासधूस होते. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी शाळेत कसे जायचे?” असा सवाल उपस्थित केला.
याशिवाय काही ठिकाणी वनक्षेत्रात बाहेरील व्यक्तींनी मोठ्या प्रमाणात डोंगर पोखरून अतिक्रमण केल्याचा आरोप करत, अशा प्रकरणांवर वनविभाग कारवाई करत नसल्याची टीका त्यांनी केली. मात्र स्थानिकांनी एखादी फांदी तोडली तरी त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातात, ही दुहेरी भूमिका थांबवून संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी आमदार केसरकर यांच्याकडे केली.
या बैठकीला नगराध्यक्ष श्रद्धाराजे भोसले, सभापती सुष्मिता जाधव, प्रांताधिकारी विरसिंग वसावे, तहसीलदार श्रीधर पाटील, मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page