घरांचे, शेतीचे व वीज यंत्रणेचे मोठे नुकसान..
⚡कणकवली ता.०९-: खारेपाटण परिसरात शनिवारी सायंकाळी चक्रीवादळासह झालेल्या अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे अनेकांच्या घरांची कौले व सिमेंट पत्रे उडून गेली असून अनेक ठिकाणी विद्युत पोल मोडून पडले आहेत. वीज वाहिन्या तुटून रस्त्यावर लोंबकळत असल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अनेक ठिकाणी झाडे घरांवर व वाहनांवर कोसळली, तर रस्त्यावर झाडे पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. वीज पुरवठा खंडित झाल्याने संपूर्ण खारेपाटण परिसर अंधारमय झाला होता.
घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रशासनाकडून नुकसानीचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना तसेच पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतींना घटनास्थळी भेट देण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार रविवारी सकाळपासून नुकसानग्रस्त भागातील पंचनामे सुरू करण्यात आले.
रविवारी सकाळी पंचायत समिती सभापती हर्षदा वाळके, उपसभापती सोनु सावंत, प्रांताधिकारी जगदिश कातकर, तहसीलदार दिक्षांत देशपांडे, जिल्हा परिषद सदस्या प्राची इस्वलकर, पंचायत समिती सदस्य राजेश जाधव, गटविकास अधिकारी वालावलकर, पंचायत समिती सदस्य अण्णा खाडये, गुरु वर्देकर, खारेपाटण सरपंच महेंद्र गुरव, माजी सरपंच रमाकांत राऊत, ग्रामविकास अधिकारी विशाल वरवडेकर, कृषी अधिकारी, मंडल अधिकारी, तलाठी व प्रशासकीय कर्मचारी यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.
महसूल विभागाचे पथक रविवारी सकाळीच खारेपाटणमध्ये दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने काही बंद रस्ते खुले करण्यात आले असून महावितरणचे अधिकारी व कर्मचारी वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहेत.
वादळामुळे खारेपाटण हायवे ते वरुण बाजारपेठ मार्गावर हायस्कूलजवळ मोठे आंब्याचे झाड पडल्याने काही काळ वाहतूक बंद झाली होती. तसेच खारेपाटण-पोंभुर्ले मार्गावरील वायंगणी बाणेवाडी येथेही मोठे झाड पडल्याने रस्ता बंद झाला होता. त्यामुळे प्रवाशांना काही अंतर पायी चालत जावे लागले. विजयदुर्ग-कोल्हापूर राज्य मार्गावरील फणसगाव कॅन्टीन परिसरात दोन ठिकाणी झाडे कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती.
खारेपाटण पंचशील नगर परिसरात अनेक घरांची पत्रे उडून गेली असून काही ठिकाणी झाडे मोडून पडली आहेत. याच भागात पाच विद्युत पोल कोसळल्याने वीज वाहिन्या रस्त्यावर पडल्या होत्या. रामेश्वर नगर, कीपलेश्वरवाडी, कालभैरववाडी, शिवाजी पेठ, बंदरगाव, काजिर्डे, संभाजीनगर, कलेर्वाडी, जैनवाडी, कोष्टेवाडी, गुरववाडी, हसोळ टेंब कोंडवाडी आदी भागांमध्येही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक नागरिकांची आंबा, काजू कलमे, केळी व फणसाची झाडे उन्मळून पडली आहेत.
खारेपाटण काझीवाडी येथील मुश्ताक पावसकर यांच्या घराचे लोखंडी पत्र्याचे छप्पर वादळात उडून नजीर काझी यांच्या घरावर पडल्याने दोन्ही घरांचे मोठे नुकसान झाले. तसेच सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि प. पू. भालचंद्र महाराज नागरी सहकारी पतसंस्थेच्या इमारतीवरील पत्रेही उडून गेली. यातील एक पत्रा उडून एका युवकाच्या डोक्यावर पडल्याने तो जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
