देव्या सुर्याजी यांची मागणी:डॉ. विशाल रेड्डी यांच्या नावाचाही विचार करा..
⚡सावंतवाडी ता.१०-: उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या वैद्यकीय अधिक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांचा कार्यकाळ येत्या ३१ मे रोजी संपत असून रुग्णालयातील भेडसावणाऱ्या समस्या व भरली न गेलेली रिक्तपद या पार्श्वभूमीवर कोरोना काळात डॉ. उत्तम पाटील व डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर यांच्याप्रमाणे डॉ. ऐवळे यांनाही २ वर्षांचा कार्यकाळ वाढवून देण्यात यावा अशी मागणी रुग्ण कल्याण नियामक समिती सदस्य आमदार प्रतिनिधी तथा नगरसेवक श्री.देव्या सुर्याजी यांनी केली आहे.
ते म्हणाले, १९९६ पासून डॉ. ऐवळे शासकीय सेवेत रूजू आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांनी सर्वाधिक काळ सेवा दिली असून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय असलेल्या परिस्थितीत ते चांगल्या प्रकारे हाताळत आहेत. ते निवृत्त झाल्यावर एक पद रिक्त होणार असून याऐवजी डॉ. ऐवळे यांना कार्यकाळ वाढवून देण्यात यावा. यासाठी आरोग्य मंत्री श्री.प्रकाश आबिटकर यांचेही पत्राद्वारे लक्ष वेधले आहे. आमदार श्री.दीपकभाई केसरकर यांच्या माध्यमातून देखील आरोग्य मंत्रालयाचे लक्ष वेधण्यात आलेय. तर अन्य कोणाला वैद्यकीय अधिक्षक पदासाठी इतर कोणाचा विचार केला गेल्यास उपजिल्हा रुग्णालयात नव्याने रूजू झालेले व २४ तासात कधीही रुग्णालयामधे रुग्ण सेवेसाठी हजर राहणारे फिजीशीयन डॉ.विशाल रेड्डी यांचा विचार केला जावा अशी मागणी श्री. सुर्याजी यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे केली आहे.
