….शासन तिसरी योजना आणून ठेकेदार – सबठेकेदारांचे हित जोपासणार का..?
वेंगुर्ला
वेंगुर्ला तालुक्यातील आडेली गावातील आडेली खूटवळवाडी भागात नळपाणी योजना कधी कार्यान्वित होणार, असा सवाल नागरिकांतून व्यक्त करण्यात आला आहे. या कार्यक्षेत्रात शासनामार्फत बोअरवेल, त्याच ठिकाणी पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे. एक महिना कालावधीपूर्वी येथील ग्रामस्थांनी वेंगुर्ला सभापती शंकर घारे यांची भेट घेऊन त्वरित कार्यवाही न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. पाणीपुरवठा विभागामार्फत संबंधित ठेकेदारास व आडेली ग्रामपंचायतीसही पत्रव्यवहार करण्यात आला आहे. परंतु शासन याठिकाणी तोडगा काढण्यास पूर्णतः अपयशी ठरले आहे. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना मुख्यत: पाळीव जनावरांना ( गाय – म्हैस ) पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पंचायत समिती मार्फत केवळ बंधारे उद्दिष्टपूर्ती वगळता आडेली गावात आवश्यक ठिकाणी बंधारे घातले गेले नसल्याने पाण्याचा साठाच कमी झाला आहे. याबाबत आडेली कार्यक्षेत्रात घालण्यात आलेले बंधारे नक्की कोठे घातले गेले आहेत, याबाबत तातडीने पाहणी होणे आवश्यक आहे.जुने बंधारे सुस्थितीत न करता केवळ नवीन अनावश्यक ठिकाणी बंधारे बांधून काय साध्य केले आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान पावसाळा तोंडावर आला असला तरी एक महिना कालावधीत शासन याकडे लक्ष पुरविणार का अन्यथा त्याच ठिकाणी तिसरी योजना कार्यान्वित करून केवळ शासन निधीचा दुरुपयोग करणार, असा गंभीर सवाल नागरिकांतून करण्यात आला आहे.
