भाई चव्हाण: गाड्या न थांबता रवाना होतात…
⚡कणकवली ता.१५-: मध्यवर्ती अशा कणकवली बस स्थानकात रात्रीच्या वेळी लांब पल्ल्याच्या एसटी फेऱ्या नाष्टा, जेवण, प्रार्तविधी आदींसाठी काही काळ थांबवाव्यात, अशी मागणी प्रवाशी वर्गाकडून करण्यात येत आहे, अशी माहिती कोकण विकास आघाडीचे मुख्य संघटक, पत्रकार गणपत तथा भाई चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
कणकवली बस स्थानकातून रात्री ७ नंतर एसटी गाड्यांच्या मुंबई, कोल्हापूर, पुणे, धाराशिव, (उस्मानाबाद), विजापूर, पणजी आदी फेर्यां रवाना होत असतात. पुर्वी या गाड्या उपरोक्त सोयीसाठी कणकवलीत १५ ते २० मिनिटे थांबविल्या जात होत्या. मात्र कोरोनानंतर या लांब पल्ल्याच्या गाड्या न थांबता रवाना होतात, अशी माहिती देऊन चव्हाण म्हणतात, राजापूर, गगनबावडा, राधानगरी हे अंतर एसटींना पार करायला दिड-दोन तास लागतात. त्यामुळे प्रवाशांची कुचंबणा होते. पुढे नाष्टा, जेवण मिळत नाही. विशेषतः मधुमेही आदी रुग्णांना लघवीसारख्या प्रार्तविधीचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे कणकवली स्थानकात या गाड्या थांबवाव्यात अशी मागणी करत आहेत.
