⚡कणकवली ता.११-:
कणकवली रेल्वेस्टेशन येथे प्लॅटफॉर्मवर लगत असलेल्या मांडवी एक्सप्रेसखाली उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रकार घडला आहे. मालवण तालुक्यातील चिंदर पालकरवाडी येथील माधवी मधुकर पाटणकर (वय ६२) या महिलेने मांडवी एक्सप्रेसखाली उडी मारून आत्महत्या केली. ही घटना शनिवारी दुपारी ११:४५ वा. च्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे रेल्वे स्थानकाचे कर्मचारी व प्रवासी वर्गात एकच खळबळ उडाली. माधवी मधुकर पाटणकर यांच्या आत्महत्येचे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही.
माधवी पाटणकर या बराचवेळ कणकवली रेल्वे स्टेशन येथे ६ व्या क्रमांकाच्या बोगीच्या ठिकाणी प्लॅटफॉर्मवर थांबल्या होत्या. मुंबईकडे जाणारी मांडवी एक्सप्रेस कणकवली स्थानकावर येण्याची घोषणा झाली, तेव्हा माधवी मधुकर पाटणकर या उठून प्लॅट फॉर्मवर रेल्वे थांबण्याच्या जागेच्या बाजूला आल्या. मांडवी एक्सप्रेस कणकवली स्थानकाकडे येताना मंद झाली व हळूहळू थांबण्याच्या बेतात होती. नेमक्या याच वेळी माधवी यांनी प्लॅटफॉर्मवरून खाली उतरत रेल्वेखाली स्वत:ला झोकून दिले.
घटनेची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक राजेश सुरवाडे, सहाय्यक उपनिरीक्षक विनोद पाटील, कॉन्स्टेबल युवराज पाटील, गणेश खोंद्रे, सनानसे राधेश्याम, विपुल म्हस्के आदींनी घटनास्थळी धाव घेतली.
कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित यादव, उपनिरीक्षक शरद देठे, पोलीस नाईक चंद्रकांत माने, रुपेश गुरव आदीही घटनास्थळी दाखल झाले. पाहणीअंती मृतदेहाचे कमरेपासून दोन भाग झाले होते. रेल्वे सुरक्षा बल व कणकवली पोलीस यांनी मृतदेह प्लॅटफॉर्मवर आणला. पुढे मृतदेह विच्छेदनासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला होता.
