तारकर्ली समुद्रात पर्यटक युवक बुडून बेपत्ता…

सायंकाळची घटना :तिघांना वाचविण्यात यश..

⚡मालवण ता.१०-: कोल्हापूर मधून मालवणात आलेला पर्यटकांचा ग्रुप तारकर्लीच्या समुद्रात स्नानाचा आनंद लुटताना चार युवक समुद्रात बुडत असताना एक युवक बुडून बेपत्ता झाल्याची दुर्घटना शुक्रवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास घडली. आदित्य पांडुरंग पाटील (रा. बस्तवडे ता. कागल, कोल्हापूर) असे बेपत्ता युवकाचे नाव असून समुद्रात बुडणाऱ्या अन्य तिघांना वाचविण्यात स्थानिकांना यश आले आहे. यातील अजिंक्य पाटील (रा. कौलंग ता. कागल, जि. कोल्हापूर) याच्यावर मालवण ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर समुद्रात बेपत्ता झालेल्या पर्यटकाचा स्थानिक मच्छीमार व स्कुबा डायव्हर यांच्या मदतीने उशिरापर्यंत शोध सुरू होता

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मुरगूड कोल्हापूर येथील सारथी सायबर क्लासेसच्या २० विद्यार्थ्यांचा एक ग्रुप शुक्रवारी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास सिंधुदुर्गात पर्यटनासाठी निघाला. यामध्ये ८ मुलगे, १२ मुली आणि एका शिक्षिकेचा समावेश होता. दुपारी कुणकेश्वर येथे देवदर्शन केल्यानंतर जेवण करून ते मालवणात दाखल झाले. साधारण ३.३० ते ४ वाजण्याच्या सुमारास तारकर्ली येथे पर्यटन केंद्रा नजिकच्या समुद्रात तें आंघोळीसाठी उतरले. यात पाण्याचा अंदाज न आल्याने आदित्य पाटील हा बुडून बेपत्ता झाला. त्याच्यासोबत असलेले अजिंक्य पाटील (वय-२१) रा. कविलगे ता. कागल, जि. कोल्हापूर, प्रसाद चौगुले, रितेश वायदंडे रा. कविलगे, ता. कागल, जि. कोल्हापूर हे देखील बुडू लागले. हा प्रकार स्थानिकांच्या लक्षात येताच स्थानिकांनी समुद्रात धाव घेत या तिघांना किनाऱ्यावर आणले. यातील अजिंक्य पाटील हा अत्यवस्थ बनल्याने त्याला १०८ रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉ. स्वप्निल दळवी यांनी सांगितले.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी विलास टेंबुलकर, महादेव घागरे ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले होते. याबाबतचा अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

You cannot copy content of this page