गणपत चव्हाण:पावणेशंभर टक्के मराठ्यांना कुठले आरक्षण मिळणार…?
⚡कणकवली ता.०९-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात महसूल खात्याने शोधलेल्या कुणबी नोंदीची आकडेवारीची एकूण मराठा समाजाच्या टक्केवारीत ००.३० एवढीच निघत आहे. त्यामुळे आता उर्वरित पावणेशंभर टक्के मराठ्यांना कुठले आरक्षण मिळणार याकडे सकल मराठा समाजाचे लक्ष लागून राहिले आहे, अशी प्रतिक्रिया मराठा समाजातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार गणपत तथा भाई चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.
कोकणातील मराठा समाजातील खेड्यापाड्यांत राहणारे ८०ते ९० टक्के समाज बांधव आर्थिकदृष्ट्या हलाखीचे जीवन जगत आहेत. कोकणातील गेल्या काही वर्षांतील १० वी आणि १२ वीच्या परीक्षा मंडळांचे निकाल हे राज्यामध्ये अव्वल आहेत. मात्र मराठा समाजातील मुलांना ८०/९० टक्क्यांपेक्षाही जास्त गुण मिळवूनही आरक्षणाअभावी वैद्यकीय, तंत्रज्ञान आदी इच्छित उच्च शिक्षण क्षेत्रात प्रवेश मिळत नाहीत. मिळाला तर त्यांच्या कुटुंबियांची भरमसाठ फी भरण्याची ऐपत नसते. परिणामी तो अन्य थातूरमातूर पदवी शिक्षणाकडे नाविलाजास्तव प्रवेश घेतो. तिथेही पदवी घेतल्यानंतर शासकीय नोकर्यांमध्ये आरक्षणाअभावी तो मग कमी पगाराच्या खाजगी क्षेत्रात नोकरी पत्करतो, असे सांगून चव्हाण म्हणतात, या अशा रहाटगाडग्यामुळे तरुणांमध्ये नैराश्य येत आहे.
मराठा समाजातील कुणबी म्हणून नोंद असलेल्यांना सरसकट मराठा-कुणबी प्रमाणपत्र दिली जातील, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. पण प्रमाणपत्र छाननी शोध मोहिमेत राज्यातील कुणबी नोंदीचे प्रमाण अर्धा टक्क्यांपेक्षाही कमी निघत आहे. त्यामुळे आता या ९९ टक्क्यांपेक्षाही जास्त मराठ्यांची कोण कोणाची फसवणूक करीत आहेत आणि कोणाला कोण टोप्या घालत आहेत, अशा संभ्रमित अवस्थेत सकल मराठा समाज आहे, असा उपरोधिक टोला लगावत ते म्हणतात, आता कुणबी जात प्रमाणपत्राला मुठमाती देऊन ९६ कुळी मराठा बांधवातील गुरव, गावडे, घाडी आदी सकल मराठा समाजाला “मराठा” च म्हणून स्वतंत्र आरक्षण मिळविण्यासाठी लढ्याची दिशा पुर्वीप्रमाणेच आखली पाहिजे. तर ५८ शांत मराठा मोर्च्यांना न्याय मिळेल.
