फळपीक विमा नुकसान भरपाई येत्या चार दिवसात न मिळाल्यास बेमुदत आंदोलन…

⚡वेंगुर्ला ता.०७-: पुनर्रचित हवामान आधारित फळ पिक विमा योजना सन २०२२-२३ अंतर्गत अद्यापही देय भरपाई मिळाली नसल्याने शेतक-यांमध्ये तीव्र नाराजी आहे. ६ नोव्हेंबर रोजी वेंगुर्ला तालुक्यातील शेतक-यांनी कृषी कार्यालयासमोर केलेले उपोषण तात्पुरते स्थगित केले. मात्र येत्या ४ दिवसात देय भरपाई न मिळाल्यास पुनश्च याच कार्यालयासमोर १० नोव्हेंबर रोजी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतक-यांनी दिला आहे.

  पुनर्रचित हवामान आधारित फळ पिक विमा योजना सन-२०२२-२३ अंतर्गत विमा संरक्षण कालावधी संपल्यानंतर ४५ दिवसांत देय भरपाई मिळणे अपेक्षित आहे. परंतु अद्यापही देय भरपाई मिळाली नसल्याने शेतक-यांमध्ये तीव्र नाराजी आहे. तरी सदर मागण्यांबाबत उचित कार्यवाहीस विनंती आहे. याबाबत शेतक-यांकडुन वारंवार पाठपुरावा सुरु होता. मात्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वेंगुर्ला तालुक्यातील शेतकरी संघाचे श्यामसुंदर राय, यशवंत सावंत, प्रदीप सावंत, संदीप नाईक, दिगंबर शेटकर, सुरेश नाईक, सुभाष परब, विजय सरमळकर आदी शेतक-यांनी तालुका कृषी कार्यालयासमोर सकाळपासून उपोषण सुरू केले होते. या उपोषणाला अजित पवार गटाचे एम.के.गावडे यांनी तसेच भाजपाचे माजी आमदार राजन तेली यांनी भेट देऊन माहिती घेतली. आपल्या मागण्या शासनामार्फत पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असे आश्वासन दिले. यानंतर कृषी विभागाच्या अधिका-यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली व चर्चा केली. यावेळी झालेल्या चर्चेनंतर येत्या चार दिवसात नुकसान भरपाई मिळावी असे सांगून शेतक-यांनी उपोषण स्थगित केले. मात्र नुकसान भरपाई न मिळाल्यास तीव्र आंदोलन करू असा इशाराही शेतक-यांच्यावतीने श्यामसुंदर राय यांनी दिला आहे.

फोटोओळी – शेतक-यांच्या उपोषणास भेट दिलेल्या आमदार राजन तेली यांना श्यामसुंदर राय यांनी माहिती दिली.

You cannot copy content of this page