पर्ससीन मच्छिमारांचा इशारा :तर या
प्रश्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही लक्ष वेधणार..
⚡मालवण ता.०५-: समुद्रात १२ नॉटीकल बाहेरील सागरी क्षेत्र हे केंद्र सरकारच्या हद्दीत येत असून त्याठिकाणी पर्ससीनसह कोणत्याही मासेमारीला बंदी नाही. असे असताना पर्ससीन नौका १२ नॉटीकल बाहेरील समुद्रात मासेमारी करून राज्याचा हद्दीतून बंदराकडे ये – जा करत असताना व पर्ससीन नौका बंदरात उभ्या आमच्या नौकांवर मत्स्य विभागाकडून होत असलेली कारवाई चुकीची व अन्यायकारक आहे. अशी कारवाई केवळ मालवणातच होत असून इतर कोणत्याही ठिकाणी अशी कारवाई केली जात नाही. हि अन्यायकारक कारवाई न थांबल्यास आम्हाला आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा आज पर्ससीन मच्छिमारांनी पत्रकारांशी बोलताना दिला.
तळाशील समुद्रात पर्ससीन व पारंपारिक मच्छिमारांमध्ये झालेला संघर्ष आणि त्यानंतर मत्स्य विभागाने मालवण बंदरात पर्ससीन नौकांवर केलेली कारवाई या पार्श्वभूमीवर आज मालवण कुंभारमाठ येथील हॉटेल जानकी येथे मालवणातील पर्ससीन मच्छिमारांची बैठक होऊन त्यानंतर मच्छिमारांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी कृष्णनाथ तांडेल, सतीश आचरेकर, गोपीनाथ तांडेल, श्रीपाद पारकर, गौरव पारकर, गीता बापर्डेकर, वासुदेव पराडकर, रॉकी डिसोझा, सुनील खंदारे, सुनील खंदारे, सुनील खंदारे, रूजारीओ पिंटो, इलयास होलसेकर, मोहसीन होलसेकर, हनीफ मेमन खतीजा कैसर, हनीफ मेमन, सायली भिल्लरे, मनीष खडपकर, प्रथमेश लाड, राहुल हूर्णेकर, चिन्मय तांडेल, अशोक सारंग, सुनील सावंत, द्विजकांत कोयंडे, संतोष तारी आदी उपस्थित होते.
यावेळी कृष्णनाथ तांडेल म्हणाले, पर्ससीन मच्छिमारांच्या न्याय हक्कासाठी गत वर्षी मालवण येथील मत्स्य कार्यालयासमोर आम्ही साखळी उपोषण आंदोलन केल्यानंतर आमच्या मागण्याबाबत केंद्र सरकारचे लक्ष वेधल्यावर मत्स्य विभागाचे केंद्रीय सचिव यांनी राज्य शासनाला दिलेल्या पत्रात समुद्रात १२ नॉटीकल अंतरातील क्षेत्र हे राज्याच्या हद्दीचे असून त्या बाहेरील सागरी क्षेत्र केंद्र सरकारच्या हद्दीचे आहे. १२ नॉटीकल बाहेरील सागरी क्षेत्रात पर्ससीनसह इतर कोणत्याही पद्धतीने मासेमारी करण्यास बंधने नाहीत, असे म्हटले आहे. त्यानुसारच पर्ससीन नौका १२ नॉटीकल बाहेरील सागरी क्षेत्रात मासेमारी करत असतात. असे असताना पर्ससीन नौका मासेमारी करून राज्याच्या हद्दीतून बंदरात येत असताना किंवा बंदरात नौका उभ्या करून ठेवल्या असताना मत्स्य विभागाकडून नौका अवरुद्ध करण्याची कारवाई करण्यात येत आहे. हि कारवाई आकसापोटी व हुकूमशाही पद्धतीने होत असून उदरनिर्वाहासाठी आम्ही करत असलेला मासेमारी व्यवसाय हिरावून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशी कारवाई केवळ मालवण तालुक्यात होत आहे. याबाबत आम्ही मत्स्य अधिकाऱ्यांची भेट घेऊन सागरी हद्दी बाबत केंद्र सरकारच्या निर्देशाबाबत माहिती देऊन होत असलेली कारवाई चुकीची असल्याचे लक्षात आणून देणार आहोत. हि अन्यायकरक कारवाई न थांबल्यास आम्ही आंदोलनाची भूमिका घेऊ असे यावेळी कृष्णनाथ तांडेल यांनी सांगितले. तसेच या प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही लक्ष वेधणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी सतीश आचरेकर म्हणाले, पर्ससीन नौका राज्याच्या सागरी हद्दीत मासेमारी करताना आढळली असता केलेली कारवाई ग्राह्य मानता येईल, मात्र केंद्र सरकारच्या नियमांचे पालन करत असताना होणारी कारवाई व नौका बंदरात असताना होणारी कारवाई चुकीची आहे, मासेमारी करण्याचा आमचा मूलभूत अधिकारी काढून घेण्याचा प्रयत्न होत असेल तर आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल, असेही आचरेकर म्हणाले.
अन्यथा ७ रोजीपासून आमरण उपोषण – गोपीनाथ तांडेल
मत्स्य व्यवसाय विभागाने काही दिवसांपूर्वी मालवण बंदरात उभ्या असलेल्या गोपीनाथ तांडेल यांच्या मालकीच्या पर्ससीन नौकेवर कारवाई करून नौका अवरुद्ध केल्याने गोपीनाथ तांडेल यांनी हि कारवाई भ्याड असल्याची टीका यावेळी केली. नौका बंदरात उभी असताना केलेली कारवाई चुकीची असून ६ नोव्हेंबर पर्यंत आपल्या नौकेची सुटका मत्स्य विभागाने न केल्यास ७ रोजी पासून मत्स्य कार्यालयासमोर आपण आमरण उपोषणास बसू, असा इशारा यावेळी गोपीनाथ तांडेल यांनी दिला.
