आमदार वैभव नाईक यांच्या आश्वासनानंतर “त्या” कामगारांचे काम बंद आंदोलन स्थगित

मालवण (प्रतिनिधी) ठेकेदाराने चार महिन्यांचे वेतन थकविल्याने काम बंद आंदोलन छेडणाऱ्या मालवण नगरपालिकेच्या कंत्राटी कचरा वाहन चालकांनी याप्रश्नी आम. वैभव नाईक यांचे लक्ष वेधून आपली कैफियत मांडली. याबाबत आम. नाईक यांनी संबंधित ठेकेदाराशी चर्चा करून येत्या सोमवारी दोन महिन्यांचे तर गुरुवारी उर्वरित दोन महिन्यांचे वेतन देण्यात येईल असे आश्वासन चालकांना दिले. यामुळे वाहन चालकांनी आपले काम बंद आंदोलन स्थगित करून उद्या शुक्रवार पासून कामावर रूजू होण्याचा निर्णय घेतला आहे. मालवण नगरपालिकेत कंत्राटी पध्दतीने काम करणाऱ्या स्वच्छता कामगार व कचरा वाहन चालक यांचे तीन- चार महिन्यांचे वेतन ठेकेदारांनी थकविल्याने कामगारांनी काम बंद आंदोलन झेडले होते. यातील स्वच्छता कामगारांच्या ठेकेदाराने वेतन देण्याचे आश्वासन दिल्याने स्वच्छता कामगारांनी काम बंद आंदोलन स्थगित केले होते. तर वाहन चालकांच्या ठेकेदाराने वेतन देण्याबाबत प्रतिसाद न दिल्याने वाहन चालकांनी आपले काम बंद आंदोलन सुरूच ठेवले होते. थकीत वेतनाबाबत ठेकेदार तसेच नगरपालिकेकडून न्याय मिळत नसल्याने गेले नऊ दिवस काम बंद आंदोलन झेडणाऱ्या कचरा वाहन चालकांनी आज मालवण दौऱ्यावर आलेल्या आम. वैभव नाईक यांची भेट घेत आपली व्यथा मांडली. यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, नगरसेवक मंदार केणी, यतीन खोत आदी उपस्थित होते. यावेळी आम. नाईक यांनी दूरध्वनीद्वारे संबंधित ठेकेदाराशी चर्चा करीत चालकांचे वेतन देण्याची सूचना केली त्यानुसार ठेकेदाराने येत्या सोमवारी दोन महिन्यांचे तर गुरुवारी उर्वरित दोन महिन्यांचे वेतन देण्याचे मान्य केल्याची माहिती आम. नाईक यांनी चालकांना दिली. यामुळे चालकांनी आपले आंदोलन स्थगित करीत उद्यापासून कामावर रुजू होण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान मालवण नगरपालिकेच्या कचरा वाहून नेणाऱ्या पाच गाड्यांपैकी चार गाड्या नादुरुस्त होऊन बंद असल्याबाबत वाहन चालकांनी आम. वैभव नाईक यांचे यावेळी लक्ष वेधले. यावर आम. नाईक यांनी बंद गाड्या दुरुस्त करून कार्यान्वित करण्याच्या सूचना नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांना दिल्या.

You cannot copy content of this page