दिवाळीच्या निमित्ताने नव्या राजकीय समीकरणांची नांदी नव्हे ना?
⚡कणकवली ता.०५-: दीपावली सण आठ दिवसात येऊन ठेपला असताना राजकीय दिवाळी रंग भरत असल्याचे दिसत आहे. भाजपा मध्ये ‘ऑल इज वेल ‘ नसल्याचे काही दिवसापूर्वी भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांनी नाराजी व्यक्त करत दाखवून दिले होते. मात्र दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्यांसमवेत कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे माजी खासदार निलेश राणे यांचा लागलेला बॅनर पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. उद्योजक किरण सामंत यांच्या समृद्धी फाउंडेशनच्या माध्यमातून या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
माजी खासदार निलेश राणे यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तोडगा काढत माजी खासदार निलेश राणे यांची नाराजी काही प्रमाणात दूर केली होती . निलेश राणे यांनी नव्या उमेदीने पक्ष कामास सुरुवात केली.
बॅनर ठरतोय लक्षवेधी
‘अश्विनची नवी सोनेरी पहाट,
नव्या स्वप्नांची नवी लाट,
नवा आरंभ नवा विश्वास,
दीपावलीची हीच तर खरी सुरवात’
असा मजकूर असलेला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे संभाव्य उमेदवार म्हणून इच्छुक असलेले उद्योजक किरण सामंत त्याचप्रमाणे राज्याचे उद्योग मंत्री नाम. उदय सामंत यांचे फोटो असलेला दिवाळी सणाच्या शुभेच्छा देणारा बॅनर झळकला आहे.
राजकीय चर्चाना उधाण
भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांनी आपली भूमिका जाहीरपणे व्यक्त करताना ट्विट करीत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या .त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच सिंधुदुर्गचे पालकमंत्री आमदार रवींद्र चव्हाण यांच्यासह चर्चा करत माजी खासदार निलेश राणे यांची नाराजी दूर केली होती . त्यामुळे हा विषय संपला असे वाटत असतानाच पुन्हा एकदा कणकवलीत शिवसेना नेत्यांनी माजी खासदार निलेश राणे यांना आपल्या बॅनरवर चर्चांना वाट मोकळी करून दिली आहे.
कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे लागलेला हा बॅनर लक्षवेधी ठरत असून या बॅनर मागचा नेमका उद्देश काय अशी चर्चा आता रंगू लागली आहे. हा बॅनर उद्योजक किरण सामंत यांच्या समृद्धी फाउंडेशनच्या माध्यमातून लावण्यात आला असला तरी राजकीय चर्चा या सुरूच राहणार आहेत.
